देशात व राज्यात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संक्रमणाचे थैमान सुरू झाले. या कालावधीत भाजीपाला, खाद्यतेल, कडधान्य व मसाले यांच्या किमतीत कमालीची वाढ झाली तर पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे दळण वाहनासह वाहतूक खर्च वाढल्याने महागाईचा भडका उडाला. यात सर्वसामान्य जनता व मध्यमवर्गीय नागरिक होरपळून निघत आहेत. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या भावात दीडपट वाढ झाली आहे तर त्या तुलनेत कोरोना विषाणू संक्रमणामुळे आजारपणाच्या खर्चासह बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारात आर्थिक परिस्थिती बिघडली व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय पातळीवर महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने आता जगावे तरी कसे या विवंचनेत नागरिक आहेत.
तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला खर्च
खाद्यतेल - २८०
धान्य - २५०
शेंगदाणे - १२०
साखर - ४५
साबुदाणा ०
चहापूड - २००
डाळ - ५०
गॅस सिलेंडर - ८५०
पेट्रोल - ३६००
एकूण ५३७५
■ डाळी शिवाय वरण
दररोजच्या जेवणात वरण भाताचा व ग्रामीण भागात सायंकाळच्या जेवणात खिचडीचा समावेश असतो. एरवी ५० ते ६० रुपये प्रति किलो असलेली तुरदाळ मार्च २०२० नंतर आज अखेर १०० रुपये प्रति किलो झाली आहे. वरण व खिचडी बनविताना प्रामुख्याने तूर डाळीचा वापर केला जातो. पाच सदस्यांच्या एका कुटुंबाला साधारणतः महिन्यात दहा किलो तूर डाळ लागते. तूरडाळीचे भाव दुप्पट झाल्याने डाळी शिवाय वरण अथवा खिचडी करावी का अशी विवंचना गृहिणींना सतावत असते.
अशी वाढली महागाई जानेवारीतील दर प्रति किलो
शेंगदाणा तेल १२०
सोयाबीन तेल १००
शेंगदाणे ९०
साखर ३१
साबुदाणा ७०
मसाले १०००
चहापूड ४००
तूर डाळ १००
उडीद डाळ १२०
मूग डाळ ९०
हरभरा डाळ ६५
■ सध्याचे दर
शेंगदाणा तेल १६०
सोयाबीन तेल १४०
शेंगदाणे १२०
साखर ४०
साबुदाणा ७०
मसाले १०००
चहापूड ५००
तूर डाळ १००
उडीद डाळ १००
मूग डाळ ९०
हरभरा डाळ ६५
गॅस सिलेंडर हजाराच्या घरात
गेल्या काही वर्षापासून गॅस सिलिंडरचे दरमहा भाव वाढवत आहे. साधारण दुप्पट किंमत घरगुती वापराच्या गॅसची झाली आहे. सर्वसाधारण कुटुंबाला एका वर्षात १४ ते १६ गॅस सिलिंडर लागतात. गॅस सिलेंडरची वाटचाल हजार रुपयांकडे सुरू असल्याने सर्वसाधारण कुटुंबीयांचे वार्षिक बजेट सहा ते सात हजार रुपयांनी वाढले आहे. ग्रामीण भागात भयावह परिस्थिती असून, गॅसची दरवाढ झाल्याने अनेकांनी चुलीवर स्वयंपाकाला प्राधान्य दिले आहे. मात्र, चूल पेटवण्यासाठी रॉकेल हा महत्त्वाचा घटक असून, केंद्र शासनाने रॉकेलच्या विक्रीवर बंदी घातली असल्याने आता चूल पेटवावी कशी अशी विवंचना ग्रामीण भागातील महिलांना सतावत असते.