या प्रयोगशाळेसाठी एकूण आठ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यात वर्ग दोनचे एक अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, लिपिक, अनुरेखक आदी पदे मंजूर करण्यात आली आहेत. या पदांवर कर्मचारी नियुक्त करून प्रयोगशाळेसाठी लागणारी मशिनरी खरेदी केली जाणार आहे. यासाठी शासनाकडून वेळाेवेळी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या माती परीक्षण प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा शेतीत वापर किती आणि कसा करावा, याची माहिती मिळणार आहे.
मातीपरीक्षणामुळे जमिनीतील सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, जस्त, बोराॅन, लोह, मँगनीज तसेच तांबे याचे प्रमाण तपासले जाते. जिल्ह्यातील बऱ्याच भागात फाॅस्फेट व एमओपी या रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांनी जपून करावा, असा अहवाल धुळे कृषी महाविद्यालयाच्या मातीपरीक्षण प्रयोगशाळेने दिला होता. पीक कापणी प्रयोगातून कृषी विभागाने ही माहिती दिली होती. जिल्हा निर्मितीच्या २१ वर्षानंतर माती परीक्षण प्रयोगशाळा निर्माण होणार असल्याने शेतकऱ्यांना माेठा आधार मिळाला आहे.