रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यात कोरोना संसर्गाच्या रूग्णांची संख्या नंदुरबार जिल्ह्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे यावर समाधान मानणाऱ्या नंदुरबार जिल्हावासीयांची चिंता आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. जस जशी स्वॅब तपासणीची संख्या वाढत आहे तस तसे रूग्णांची संख्याही वाढत असून, हा आकडा आता ५०० च्या पार झाला आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे मृत्यूची संख्या वाढत असून, ती सर्वांनाच काळजी करायला भाग पाडणारी आहे. त्यामुळे आता मृत्यू रोखण्यासाठी व्यापक नियोजनाची आवश्यकता आहे.नंदुरबार जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लागन सुरूवातीच्या काळात नाही बरोबर होती. मार्च आणि एप्रिल महिन्यात ती नगण्यच होती. पण मोठ्या शहरातून हा संसर्ग लहान शहरात आणि लहान शहरातून ग्रामीण भागातही पोहोचल्याने रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात उपाययोजनांचा खूप गवगवा झाला. मात्र रूग्ण संख्या कमी असल्याने शासन आणि प्रशानाने सोयीसुविधांच्या बाबतीत खूपकाही गांभीर्याने घेतले नाही. दुर्देवाची बाब म्हणजे अजूनही पूर्णपणे स्वॅब तपासण्याची सुविधा नंदुरबार जिल्ह्यात झाली नाही. या महिन्याच्या सुरूवातीला जेमतेम अॅन्टीजेन तपासणीची सुविधा झाली. त्यालाही मर्यादा आहेत.बहुतांश स्वॅब अजूनही धुळ्यालाच तपासणीसाठी पाठवावे लागतात. अहवाल येण्यासाठी किमान चार ते पाच दिवस प्रतीक्षा करावी लागते. खरे तर कोरोनाच्या नावाची भिती जनमानसात प्रचंड आहे. त्यामुळे ज्या व्यक्तिने स्वॅब तपासणीसाठी दिला त्या व्यक्तीला अहवालासाठी पाच दिवसाची प्रतीक्षा करावी लागत असेल तर त्याच्या मानसीक स्थितीची कल्पना न केलेलीच बरी. ते चार-पाच दिवस त्या व्यक्तीसाठी कसे जात असेल ते त्यालाच ठाऊक. शिवाय अहवाल उशिरा येत असल्याने रूग्ण जर पॉझिटीव्ह आला तर त्याला उपचारालाही सहाजिकच उशिर होतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहिल्यास जून अखेरपर्यंत एकूण १६३ रूग्ण होते. त्यातून ७४ रूग्ण बरे होवून घरी पाठविण्यात आले होते तर सात जणांचा मृत्यू झाला होता. टक्केवारीत विचार केल्यास बरे होणाºया रूग्णांची टक्केवारी ४५.३९ टक्के होती तर मृत्यू दर ४.२९ टक्के होता. हेच चित्र जुलैअखेरपर्यंत गंभीर वळणावर आले आहे. सध्या रूग्णांची संख्या ५१३ झाली आहे. म्हणजे २९ दिवसात ती पटीपेक्षा जास्त रूग्ण वाढले आहेत तर मृत्यूची संख्या २९ अर्थात ५.६५ टक्के आहे. समाधानाची बाब म्हणजे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. ते म्हणजे ३३० रूग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण ६४.३२ टक्के अर्थातच राज्याच्या सध्याच्या सरासरी टक्केवारीच्या प्रमाणात अधिक आहे.दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यात स्वॅबचे नमुने तपासणीचे प्रमाण खूपच कमी आहे. जून अखेरपर्यंत केवळ १९५२ जणांचे स्वॅब तपासण्यात आले होते तर जुलै अखेरपर्यंत ही संख्या तीन हजार ५६५ पर्यंत गेली आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १७ लाखाहून अधिक आहे. त्या तुलनेत जेमतेम ०.२ टक्केही तपासणी झालेली नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून तपासणीचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर स्वॅब संकलन होणार आहे. नंदुरबार शहरात तर स्वतंत्र फिरते वाहन स्वॅब संकलनासाठी फिरणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातच स्वतंत्र आधुनिक स्वॅब तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे.येत्या आठवड्याभरात ती कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. ही प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यास जिल्ह्यातच स्वॅब तपासणी होणार असून, त्याची क्षमताही रोजची एक हजार २०० असल्याने स्वॅब तपासणीची संख्याही वाढणार आहे.प्रयोगशाळेनंतर आता मात्र गंभीर रूग्णांवर उपचारासाठीही आधुनिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. विशेषत: या रूग्णांसाठी बहुचर्चीत असलेले टोसिलाझूम व रेमडिसीव्हर हे इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे तेवढेच गरजेचे आहे. याबाबत सातत्याच्या मागणीनंतर जिल्ह्याला जेमतेम ४० रेमडिसीव्हर व १० टेसिलाझूम इंजेक्शन मिळाले आहे. एखाद्या खाजगी रूग्णालयातही या पेक्षा जास्त इंजेक्शन हे उपलब्ध असू शकले, अशी स्थिती आहे. त्यामुळे त्याचा पुरेशासाठा उपलब्ध करण्यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता आहे.
कोरोनाच्या वाढत्या मृत्यूची संख्या चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 13:05 IST