जगभरातील १८१ देशांतील १० हजार ६५५ विद्यापीठातील पाच लाख ६५ हजार ५५३ संशोधकांमधून करण्यात आलेल्या निवडीमधून वर्ल्ड सायंटिस्ट ॲण्ड युनिव्हर्सिटी रँकिंग - २०२१ जाहीर करण्यात आले आहे. त्यात कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयासह प्रा.डॉ.आर.झेड. सैयद यांचे नाव जागतिक वैज्ञानिक क्रमवारीत समाविष्ट झाले आहे. ते या क्रमवारीत विद्यापीठात प्रथम क्रमांकावर, देशात चार हजार ९६३ व्या क्रमांकावर, आशियामध्ये ३८ हजार ६९९ व्या क्रमांकावर तर जगात दोन लाख ३१ हजार ६२४ व्या क्रमांकावर आहेत. प्रा.डॉ. रियाजअली सैयद हे शहादा महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी विभागात प्रोफेसर आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते एशियन पीजीपीआर सोसायटी फॉर सस्टेनेबल एग्रीकल्चर इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे प्लांट मायक्रोब परस्परसंवादात २० वर्षांचे संशोधन कौशल्य आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये १६७ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.
या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, पी.आर. पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील आदींनी प्रा.डॉ.सैय्यद यांचे कौतुक केले.