रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तब्बल तीन ते चार दशकांपासून जिल्ह्याचे राजकारण ज्या नेत्यांभोवती केंद्रीत होते त्या नेत्यांचे वारसदार या निवडणुकीत प्रथमच सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत राजकारणाचा नव्या पिढीचा प्रभाव दिसून येणार आहे. नंदुरबार जिल्हा निर्मितीपूर्वी व जिल्हा निर्मितीनंतर आजवर या जिल्ह्यावर काही ठराविक कुटूंबांचाच राजकारणाचा प्रभाव राहिला आहे. विशेषत: महाराष्ट्र स्थापनेनंतर या जिल्ह्यात माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत, माजीमंत्री व ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक, माजी आमदार स्व.बटेसिंह रघुवंशी, माजी आमदार स्व.पी.के.अण्णा पाटील या नेत्यांच्या भोवती राजकारण केंद्रीत होते. त्यापैकी स्व.बटेसिंह रघुवंशी यांचे पूत्र आमदार चंद्रकांत रघुवंशी व स्व.पी.के.अण्णा पाटील यांचे पूत्र दीपक पाटील हे राजकारणात सक्रीय झाले आहेत. आमदार रघुवंशी हे 90 च्या दशकापासून तर आजवर जिल्ह्याच्या काँग्रेसची धूरा प्रभावीपणे सांभाळत आहेत. याच काळात माजी मंत्री व आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार अॅड.के.सी.पाडवी हे देखील राजकारणात आले. त्यामुळे 90 च्या दशकानंतर ज्येष्ठ नेत्यांमध्ये माणिकराव गावीत, सुरुपसिंग नाईक, यांच्यासोबत चंद्रकांत रघुवंशी, डॉ.विजयकुमार गावीत, आमदार अॅड.के.सी.पाडवी यांच्या हाती राजकारणाची सूत्रे होती. ती आजतागायत कायम आहे. यावेळी मात्र प्रथमच नेत्यांचे वारसदार निवडणुकीत सक्रीय होत असल्याचे चित्र आहे. ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते नवापूरमधून भाजपतर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असून त्यादृष्टीने ते कामालाही लागले आहेत. याच तालुक्यात आमदार सुरुपसिंग नाईक हे आता वयोमानाने थकल्याने त्यांचे पूत्र व आदिवासी कारखान्याचे चेअरमन शिरिष नाईक हे काँग्रेसची उमेदवारी करणार आहेत. डॉ.विजयकुमार गावीत यांची कन्या खासदार डॉ.हिना गावीत या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजकारणात आल्या. सध्या त्या दुस:यांदा खासदार झाल्या आहेत. या निवडणुकीत डॉ.विजयकुमार गावीत हे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात राहणार असले तरी त्यांची लहान कन्या डॉ.सुप्रिया गावीत या देखील निवडणुकीची तयारी करीत असून नंदुरबार किंवा अक्कलकुवातून त्यांची उमेदवारी करण्याचे प्रय} सुरू आहेत. या बरोबरोरच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र राम रघुवंशी हे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. नुकतेच ते राजकारणात सक्रीय झाले आहेत. विधानसभेसाठी सर्व मतदारसंघ राखीव असल्याने येणा:या जिल्हा परिषद निवडणुकीत ते सक्रीय होतील असे चित्र आहे. आमदार उदेसिंग पाडवी हे सध्या शहादा तळोदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. यावेळी देखील निवडणूक लढविण्यास ते इच्छूक आहेत. मात्र त्यांचे पूत्र राजेश पाडवी हे देखील भाजपच्या उमेदवारीसाठी प्रय}शील असून यासाठी त्यांनी चक्क आपले पीता उदेसिंग पाडवी यांनाच आव्हान दिले आहे. विधानसभा निवडणुकीतील राजकारणात नेत्यांच्या वारसदारांचा प्रभाव राहणार असून राजकारणाची सूत्र नव्या पिढीकडे जाण्याचे ते संकेत आहेत.
Vidhan Sabha 2019 : जिल्ह्याच्या राजकारणात नव्या पिढीची छाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:23 IST