नंदुरबार : यंदा नदी, नाले, तलावांमध्ये पाणीच नसल्याने गणपतींच्या पोअीपीपासून तयार केलेल्या मूर्ती कशा विरघळणार याबाबत शंकाच आहे. त्यामुळे आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मूर्ती विसर्जन करता येणार आहे. त्यासाठी केवळ खाण्याचा सोडा आणि पाण्याचा वापर केल्यास मूर्ती दीड ते दोन दिवसांत विरघळते. काही मूर्तिकारांनी देखील या पद्धतीचे स्वागतच केले आहे.
गणेशोत्सवात यंदा मोठ्या मूर्तींना परवानगी नाही. केवळ चार फुटांपर्यंतच्या मूर्तींची मर्यादा घालून देण्यात आली आहे. असे असले तरी शाडूमातीपासून बनविण्यात आलेल्या मूर्तींसोबतच पीओपीपासून बनविण्यात येणाऱ्या मूर्तींचे प्रमाण देखील जास्त आहे. अशा मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे नदी, तलावांमध्ये अशा मूर्ती उघड्यावर पडून असतात. यंदा तर पाऊसच नसल्यामुळे नदी, तलाव यांच्यात पाणी नाही. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी कसरत होणार आहे. त्यात खाण्याच्या सोड्याद्वारे घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन सहज शक्य आणि सोयीचे ठरणार आहे.
पीओपीच्या मूर्तीचीच अधिक विक्री
n यंदाच्या गणेशोत्सवातदेखील पीओपीच्या मूर्तींचीच अधिक विक्री होत असल्याचे चित्र आहे.
n शाडू मातीपासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींना मागणी असली तरी त्या विक्रीसाठी कमी असतात. त्यामुळे अनेकांचा कल हा पीओपीच्या मूर्तींकडेच असतो.
n खाण्याच्या सोड्यात मूर्ती विरघळल्यानंतर गाळ तयार होतो. हा गाळ अगदी पातळ असतो. त्यामुळे त्याचा उपयोग नंतर खत म्हणूनदेखील केला जाऊ शकतो. त्यासाठी कुठल्याही प्रक्रियेची गरज नाही.
n शाडूच्या मातीच्या मूर्तीचेदेखील घरगुती स्वरूपात विसर्जन केल्यास सोयीचे होते. साध्या पाण्यात अशा मूर्ती विसर्जित केल्यास एका दिवसात विरघळून ती माती घरगुती झाड्याच्या कुंडीमध्ये वापरता येऊ शकते.
मूर्तिकार काय म्हणतात
n मूर्तिकारांच्या म्हणण्यानुसार ही पद्धती सोयीची आणि सुटसुटीत आहे. कृत्रिम तलाव आणि नदीच्या पाण्यात मूर्ती लवकर विरघळत नाही.
n यंदा लहान मूर्ती असल्यामुळे अर्थात चार फुटांपर्यंतच्या मूर्ती असल्यामुळे त्या घरच्या घरी विसर्जित करण्यासाठी सोयीचे ठरणार असल्याचेही मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
n खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून त्यात पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन केल्यास त्या किमान ४० ते ४८ तासात विरघळतात.
n त्यासाठी पाण्याचे प्रमाण आणि खाण्याच्या सोड्याचे प्रमाण हे मर्यादित असावे. तसे झाल्यास ते सोयीचे ठरते.