नंदुरबार : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण जिल्ह्यात वेगात सुरू आहे. या एकूण सात लाख नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणाचा हा वेग वाढता असला तरीही अनेकजण अद्यापही ताप न आल्यास लस खरी की खोटी अशी पडताळणी करत आहेत. परंतु ताप येणे किंवा न येणे ही लस घेतल्याचे प्रमाण ठरू शकत नसल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. यातून आरोग्य विभागाने केंद्रांमध्ये वाढ करत लसीकरण सुरू ठेवले होते. यातून आजअखेरीस जिल्ह्यात सहा लाख ८३ हजार ६७० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या एकूण ४५ टक्के नागरिकांना पहिला किंवा दुसरा डाेस दिला आहे. एकीकडे लसीकरण वेगात सुरू असताना दुसरीकडे लस घेण्याबाबत समज-गैरसमज अद्यापही दूर झालेले नाहीत.
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार लस घेतल्यानंतर ताप येणे हे चांगले असल्याचे; परंतु ताप आलाच पाहिजे हे गरजेचे नसल्याचेही सांगण्यात येते. व्यक्तीच्या प्रकृतीनुसार अनेक बाबी या वेगळ्या ठरू शकतात. यातून लस घेतल्यानंतरचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी कोविशिल्ड लस घेतल्यानंतर ताप आल्याचे सांगितले तर काहींनी ताप न आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाऊन विचारणा करत आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या बहुतांश जणांना ताप किंवा इतर त्रास जाणवलेला नाही.
गेल्या आठवड्यात लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतु लस घेतल्यावर कोणताही त्रास जाणवला नाही. याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांना संपर्क केला होता. परंतु नाॅर्मल असल्याचे त्यांनी सांगितल्याने विश्वास बसला.
- लसीकरण झालेला युवक, नंदुरबार
मुलाने लस घेतल्यानंतर त्याला ताप आला नाही. लस बोगस आहे की, काय म्हणून डाॅक्टरांना विचारणा केली. परंतु मुलाची शारीरिक क्षमता ही चांगली असल्याने त्याला ताप आला नसावा, असे सांगण्यात आले. शंकेचे समाधान झाले.
-योगिता पाटील, नंदुरबार
ताप आलाच पाहिजे हे काही प्रमुख लक्षण नाही. लस घेतल्यानंतर तिचा प्रभाव हा राहणारच आहे. नागरिकांनी शंका-कुशंकांपेक्षा लसीकरण करून घेणे योग्य राहील. लस सुरक्षित आहे.
-डाॅ. के. डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.