सातपुड्यातील होळी उत्सव म्हणजे आदिवासींना चैतन्य देणारा उत्सव आहे. या उत्सवासाठी नागरिकांना वर्षभरापासून ओढ लागलेली असते. त्यामुळे घराघरांत सणाच्या तयारीचे नियोजन असते. विशेष म्हणजे या उत्सवात मानता फेडली जाते. त्यामुळे आदिवासींसाठी अतिशय श्रद्धेचा हा सण आहे. यावर्षी जिल्ह्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने शासनाने अनेक प्रतिबंधात्मक नियम जाहीर केले आहेत. कोरोना रोखण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन यासंदर्भात व्यापक चर्चा झाली. होळी सण हा आदिवासींच्या श्रद्धेशी जोडला असल्याने शासनाचे नियमांचे पालन करत होळी साजरा करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी गावोगावी लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ज्या गावात, ज्या तारखेला होळी उत्सव होणार आहे त्यादिवशी त्या गावात होळी पेटणार. त्याची पूजा-अर्चा, नवस, मानता भाविक फेडतील. पण हे करताना सर्व नियम पाळावेत. यासंदर्भात आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचेही मार्गदर्शन घेण्यात आल्याची माहिती रतन पाडवी यांनी दिली.
सातपुड्यातील होळी नियम पाळून साजरी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST