ब्राह्मणपुरी : पाेटाची खळगी भरण्यासाठी माणूस काहीही करण्यास तयार हाेताे. पण पोटाची खळगी भरण्यासाठी आजही काही भटक्या जमातीतील नागरिक जीवाची बाजू मांडत विविध कसरती करताना दिसत आहेत. खरे तर याचा विचार करून सरकारी यंत्रणेने या घटकांसाठी योग्य ती दिशा देऊ करणे गरजेचे आहे.
पाठीवर बिऱ्हाड घेऊन भटकंती करणारे हे भटक्या जमातीतील नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी जाऊन कसरतीचे खेळ दाखवतात. त्यात केसांना कार बांधून, दातांच्या सहाय्याने दगड उचलणे, अशा जीव धोक्यात घालून कसरती करत असतात. काळजाचा ठोका चुकविणारे त्याचे हे खेळ उपस्थितांच्या टाळ्यांची दाद मिळवून जातात. बक्षीसरूपी पैसे व शाबासकीही मिळते. मात्र, त्यांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न खेळ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो.
अगदी सकाळीच एखाद्या गावाच्या रस्त्यावर अथवा चौकात ढोलकीचा आवाज सुरू होतो. ढोलकीचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमू लागते. केसांच्या सहाय्याने बांधलेल्या दोरीने चक्क कार ओढत असल्याचे पाहण्यासाठी आलेले नागरिक थबकतात. स्वतःच्या डोळ्याने एका नाण्याच्या साह्याने दोन खुर्च्या उचलणे, तर कधी केसांना दोरीच्या सहाय्याने दोन सिलिंडर गोल फिरवायचे, तर हाताने दगड फोडायचे असे हे जीवघेणी, चित्तथरारक कसरतीचे प्रयोग रसीद सय्यद शाबास इंडियाची टीम गेल्या ४५ वर्षांपासून खेडोपाडी जाऊन करून दाखवते.
या भटक्या जमातीच्या लोकांकडे उपजीविकेसाठी दुसरे कसलेच साधन नसल्याने त्यांचा प्रवास असाच सुरू असतो. सध्या या लोकांचे खेळ ग्रामीण भागात सुरू असून, ठिकठिकाणी ही कसरत पाहावयास मिळत आहे.
सय्यद शाबास इंडिया ही टीम गेल्या २० वर्षांपासून शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे वास्तव्यास आहे. आपल्या भावांसोबत महाराष्ट्रासह इतर राज्यात आपला खेळ दाखवण्यासाठी आठ महिने भ्रमंती सुरू असते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गर्दीचे कार्यक्रम शासनामार्फत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याची प्रतिक्रिया रसीद सय्यद यांनी दिली.