केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची जनसंवाद यात्रा १६ ऑगस्टपासून नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत येणार आहे. या संवाद यात्रेचा कार्यक्रम तळोदा येथेही नियोजित केला आहे. त्याच्या नियोजनासाठी शुक्रवारी सकाळी आमदार कार्यालयात आमदार राजेश पाडवी यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, ओबीसी सेलचे प्रदीप शेंडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यादरम्यान युवा मोर्चाचे जगदीश परदेशी या पदाधिकाऱ्याने स्वीकृत नगरसेवकांचा रेंगाळलेला मुद्दा उपस्थित केला. त्याचवेळी या पदावर असलेले स्वीकृत नगरसेवक हेमलाल मगरे यांना तो चांगलाच झोंबला. यातून दोघांत तू-तू, मैं-मैं झाली. मगरे यांनी राजीनामा देण्याबाबत साफ नकार दिला. त्यामुळे दुसरे इच्छुक परदेशी हेही संतापले. दोघांमध्ये चांगलीच खडाजंगीही झाली. यातून प्रकरण हातघाईवर येणार असल्याची चिन्हे दिसताच आमदार पाडवी यांनी मध्यस्थी करीत दोघांना शांत करत वादावर पडदा पाडला. मात्र, भाजपच्या या बैठकीतील पदाधिकाऱ्यांमधील कलगीतुऱ्याची शहरात राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती.
वर्षभरापासून या विषयावर सुरू आहे धुसफूस
नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून विविध विषय समित्या व स्वीकृत नगरसेवक निवडीच्यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वीकृत नगरसेवकपदावर समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी एका वर्षासाठी पद देण्याचे धोरण निश्चित केले होते. त्यावेळी अनेक जण या पदासाठी इच्छुक होते. साहजिकच, या निर्णयामुळे अनेकांना आशा लागली होती. या सूत्रानुसार माळी समाजातील हेमलाल मगरे यांची वर्णी लावण्यात आली होती. परंतु, याबाबत तत्कालीन पदाधिकाऱ्यांनीही मौन पाळून हा मुद्दा तसाच रेंगाळत ठेवला आहे. त्यामुळे वर्षभरापासून पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले.