लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या साहाय्यक प्राध्यापकाचे मानधन हे रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आणि दारिद्र्यात उच्च शिक्षणाचा भार पेलणारा तासिका तत्त्वावरील साहाय्यक प्राध्यापक आपले जीवन कंठित आहेत. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास १२० नेट-सेट पात्रताधारक असून, ५५ तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने त्यांचे सर्वच पर्याय बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक जण शेतीत मजुरीचे काम करून आपला चरितार्थ भागवत आहेत. त्यांच्या पदरी आलेली ही अवहेलना थांबविण्यासाठी शासनाने तत्काळ प्राध्यापक भरतीला मान्यता द्यावी, अशी मागणी पात्रताधारक युवक-युवतींकडून करण्यात येत आहे.
शेतात शंभर रुपये रोजने मजुरीला
मी नेट/सेट २०१९ मध्ये भूगोल या विषयातून उत्तीर्ण झालेलो आहे. परंतु शासनाने प्राध्यापक भरती प्रक्रिया बंद केली आहे. माझ्याकडे प्राध्यापक बनण्यासाठीची पात्रता असूनदेखील मला आज शेतात मजुरीला जावे लागत आहे. फक्त १०० रुपये रोज मिळतो आणि त्या शंभर रुपयांत मला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. - प्रा. निवास पी. वळवी, शहादा
मोलमजुरी करून आपला चरितार्थ
महाविद्यालयातील विद्यापीठांमधील कायम असणाऱ्या प्राध्यापकाप्रमाणेच अध्यापन करणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे NAAC ची सर्व कामे करणे इ. कामे तासिका तत्त्वावरील प्राध्यापक पार पाडत असूनदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या ‘समान काम समान वेतन’ या तत्त्वाला हरताळ फासला जात आहे. CHB प्राध्यापक म्हणून त्यांच्याकडे कायम तुच्छतेने पाहिले जाते व त्यांची हेटाळणी केली जाते. आज कोरोनाच्या संकटात या CHB आणि विनाअनुदानित प्राध्यापकांचा कोणीही वाली नसून गेले नऊ महिने विनावेतन घरी बसून असलेले हे पात्रताधारक मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. - डॉ. साहेबराव एस. ईशी, शहादा
एवढी उच्च डिग्री घेतल्याचा आम्हाला पश्चात्ताप
जे शिक्षक देशाला घडवण्याचे महान कार्य करतात अशा हजारो शिक्षकांना मागील तीन महिन्यांपासून उच्च शिक्षण संचालनालय येथे आंदोलन करत तळ ठोकून राहावे लागत आहे. ही एक खूप मोठी शोकांतिका आहे. आमची परिस्थिती हलाखीची झालेली आहे. एवढा पैसा खर्च करून आम्ही एवढी उच्च डिग्री घेतल्याचा आम्हाला पश्चात्ताप होत आहे. एवढे शिक्षण घेऊनसुद्धा पात्रताधारकांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची खंत वाटत आहे. - डॉ. प्रशांत जहांगीर गावीत, नवापूर
१० वर्षांपासून लटकला प्रश्न
हा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून लटकलेला आहे. उच्चशिक्षित पात्रताधारक दोन वर्षांपासून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून, आज रस्त्यावर हक्क अधिकारासाठी आंदोलन करीत आहेत. जर उच्चशिक्षित घटकाला अधिकारासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल तर ही पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी बाब आहे. UGC ने वारंवार परिपत्रके भरतीसंदर्भात काढले आहेत. परंतु सुरळीत असलेल्या भरतीवरदेखील या सरकारने दोन वर्षांआधी बंदी आणली आहे. फायलींची फिरवाफिरव सुरू आहे. अशा प्रकारे उच्च पात्रताधारकांची फसवाफसवी केली जात असून, पुढे ही पिळवणूक थांबली पाहिजे आणि लवकरात लवकर शंभर टक्के प्राध्यापक भरती व्हायला पाहिजे, अशी मागणी पात्रताधारकांची आहे.