मंगळवारी सकाळी सुरत पोलिसांचे हवालदार चेतन पटेल व प्रताप बंडा या पथकाने शहादा तालुक्यातील तिखोरा व खेतिया रस्त्यावरील हॉटेल सभेच्या समोरील परिसरातून एक अशा दोन चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या दोन्ही गाड्या सुरत येथील टोळीने शहाद्यात प्रति गाडी दोन लाख रूपये या दराने विक्री केल्याची माहिती संबंधित वाहन घेणाऱ्यांनी गुजरात पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गाड्या ताब्यात घेऊन त्या जप्त करून सुरत येथे नेल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही वाहनचालकांचे जवाब नोंदविण्यात आले आहे. महागड्या किमतीच्या गाड्या स्वस्त दरात मिळत असल्याने नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनेकांनी या गाड्या खरेदी केल्या आहेत. हे आजपर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी सुरत पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुजरात पोलिसांनी गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत २७२ गाड्यांपैकी नवापूर व नंदुरबार तालुक्यातून २४ व शहादा तालुक्यातून मंगळवारी २ अशा २६ गाड्या जप्त केल्या असून, उर्वरित गाड्यांचा शोध सुरू आहे. संबंधित टोळीने अल्प किमतीचे आमिष दाखवून महागड्या किमतीच्या गाड्या अत्यंत स्वस्त दरात विक्री करून बक्कळ पैसा कमविला आहे. उर्वरित गाड्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात गुजरात पोलिसांचे पथक तपास करीत आहे, अशी माहिती पथकातील सदस्यांनी दिली.