नंदुरबार : सातपुड्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यासाठी ‘आमचूर निर्मिती व विक्री’ प्रकल्पास आदिवासी विकास विभागाच्या शबरी विकास महामंडळातर्फे मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी दिली.
धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात असून दुर्गम-डोंगराळ भागातील नागरिकांसाठी आमचूर तयार करणे हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. कच्च्या स्वरुपात तयार झालेले हे आमचूर बाहेरील राज्यातील व्यावसायिक विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करतात. या योजनेअंतर्गत ६ कोटी ५ लाखांच्या प्रकल्पासाठी ५ कोटी ४४ लक्ष ५० हजार एवढ्या शासनाच्या हिश्शास मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित ६० लक्ष ५० हजार स्वनिधीतून गोळा होईल, अशी माहिती मंत्री के.सी. पाडवी यांनी दिली.