आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना ऐकली असेल. परंतु अजगराच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना अंगावर काटे आणणारी आहे. अशीच घटना सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ रस्त्यावरील नागार्जुन मंदिराजवळील सातपायरी घाटानजीक असलेल्या पायवाटेवर घडली. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे तोरणमाळ परिसरातील पाड्यावरील सुरेश नानसिंग चौधरी (रा. तोरणमाळपाडा) हे स्वत:च्या मालकीच्या शेळ्या चारण्यासाठी गेले असता अचानक टेकडीवरून शेळी कोसळली. जवळच असलेल्या सुरेश चौधरी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी जाऊन पाहिले तर चक्क शेळीला अजगर गुंडाळलेल्या अवस्थेत दिसून आला. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केली. सुमारे दीड ते दोन तास अजगरने शेळीवर ताव मारला. सुमारे २० फुटांपेक्षा जास्त लांबी असलेल्या अजगराला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
तोरणमाळ वनक्षेत्रात पहिल्यांदाच अशी घटना घडली असून नागरिकांनी घाबरून न जाता जंगल भागात पाळीव प्राणी चारण्यासाठी सांभाळून घेऊन जावेत. तसेच संबंधित शेळी पालकाला नुकसान भरपाई देण्यात येईल.
- एस.के. खुणे, वनक्षेत्रपाल, तोरणमाळ