जिल्हा पोलीस दलाच्या महिला साहाय्य कक्षाकडून गेल्या सहा महिन्यांत ६३ जणांचा संसार पुन्हा नव्याने सुरू करण्यास मदत केली होती. विशेष बाब म्हणजे कक्षाकडे जानेवारी महिन्यापासून आजअखेरीस १७० तक्रारी अर्ज करण्यात आले होते. प्रामुख्याने हे अर्ज विवाहानंतरच्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकणारे होते. बहुतांश माता-पिता मुलाची बाजू म्हणून मानपानाची अपेक्षा करत अवास्तव मागण्या करीत असल्याने वादांना सुरुवात झाली होती.
अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत
शहरी भागात छानछोकीत विवाह पार पाडण्याचा हट्ट मुलाकडे धरतात. यातून मग खर्चाचा बोजा मुलीकडच्यांवर येतो. दागिन्यांची मागणी होते.
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात हे प्रकार अधिक वाढत आहेत. उच्च शिक्षित म्हणवून घेणारे पालक आणि त्यांची मुलेच विवाहात वाढीव खर्च आणि वस्तूंची मागणी करीत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.
मुलीचे माता-पिताही जबाबदार
विवाह ठरवितानाच अनेक जण मागण्या करतात. यातून मुलीची बाजू म्हणून वडीलधारे नको त्या गोष्टी मंजूर करतात. हे चुकीचे आहे. वस्तू किंवा पैशांच्या स्वरूपात मागणी करणे हे एक असामाजिक कार्य आहे.
- ॲड. प्रेमानंद इंद्रजित, विधिज्ञ
अनेक ठिकाणी हुंडा देणे-घेणे होत नसले तरी छुपे खर्च आहेत. मुलीकडच्यांवर अधिक भार कसा येईल, अशा गोष्टी तयार करून हकनाक खर्च वाढवला जातो. यामुळे साधेपणाने विवाह व्हावेत.
- पंकज पाटील, तरुण
मुळात हुंडा घेणे हा गुन्हा आहे. परंतु यानंतरही अनेक जण खुशाल मुलाकडची बाजू म्हणून पैसे मागतात. विवाह ठरवून मग पैसे वाढवून मागण्याची पद्धत गेल्या काही दिवसांत वाढली आहे.
- ज्योती पाटील, तरुणी.