नंदुरबार : नियमित लसीकरणाअंतर्गत बालिकेला पोलिओ व पेंटा व्हॅक्सीचा एकत्रीत डोस दिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारातील शहरी आरोग्य केंद्रात घडली. दरम्यान, या घटनेची चौकशी करून मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जाईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट केले.
शहरातील माळीवाडा भागातील आरोग्य केंद्रात गुरुवार, ४ रोजी नियमित लसीकरण करण्यात आले. एकुण २७ बालकांना लसीकरण करण्यात आले. पोलिओ व पेंटा व्हॅक्सीचा एकत्रीत डोस दिल्यानंतर त्यातील एका बालिकेला लस दिल्यानंतर अस्थस्थ वाटू लागल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर लसीकरण करण्यात आलेल्या सर्वच २७ बालकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कुठलाही त्रास झाला नाही.
दरम्यान, बालिकेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जाणार आहे. लसीचे नमुनेही घेण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच काय ते स्पष्ट होईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.एन.डी. बोडखे यांनी सांगितले.