वाण्याविहीर : नंदुरबार तालुक्यातील गुजरभवालीचा प्लॉट व राजापूरपाडा येथे पाणीटंचाई असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावाजवळील शिवण नदी ओलांडून महिलांना एका शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे.गुजरभवालीचा प्लॉटवरील व राजापूरपाडा येथील हातपंपाची पाण्याची पातळी खोल गेल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी गावाच्या पूर्व दिशेला असलेली शिवण नदी ओलांडून धुळवद रस्ता पार करून धारू पटेल यांच्या शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. पाणी भरण्यासाठी नळी काढली असल्याने त्या नळीद्वारे ग्रामस्थ पाणी भरतात. याठिकाणी पाणी बंद राहिले तर पुढे सोमू पटेल यांच्या शेतातील विहीरीतून पाणी आणावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले. शिवण नदीला सहा महिने पाणी राहते तेव्हा पाण्याची अडचण नसते. मात्र नदी आटल्यावर पाणीटंचाई निर्माण होऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे प्रशासनाने येथे प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गुजरभवाली प्लॉट व राजापूरपाडा ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:30 IST