पंकज मंगा पाटील, रा. ब्राह्मणपुरी असे मुख्य संशयिताचे नाव आहे. त्याच्यासह त्याला मदत करणाऱ्या अंबालाल पाटील, शांत्या पाटील, भुऱ्या शांत्या पाटील रा. ब्राह्मणपुरी यांनाही अटक करण्यात आली आहे. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या गरीब आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन ११ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केला. सदर घटना मुलगी गर्भवती राहिल्याचे समजल्यावर कुटुंबाच्या लक्षात आले. परिवाराने मुलीच्या सांगण्यावरून सदर मुलाला जाब विचारला असता, मुलाने केलेले पाप लपवण्यासाठी अल्पवयीन गर्भवती मुलीचा पाच महिन्याचा गर्भपात घडवून आणला व भ्रूणहत्या करण्यात आली. गर्भपात करण्यासाठी गावातील ओळखीच्या डॉक्टर व नर्सच्या मदतीने मध्यप्रदेशातील खेतिया येथील जंगलात नेऊन अनधिकृतरीत्या गर्भपात घडवून आणला. तसेच सदर घटनेची बाहेर कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी पीडित मुलीला देण्यात आली. सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पोलीस उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी तातडीने कारवाई करत बलात्कार करणाऱ्या नराधमास व इतर तिन्ही साथीदारांना पकडण्याचे आदेश दिले. त्याअनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ, गोपनीय शाखाचे मणिलाल पाडवी, मेहरसिंग वळवी, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे, मुकेश राठोड, पो.कॉ. धीरसिंग वळवी, दिनकर चव्हाण, भरत उगले, किरण जिरेमाळी या पथकाने आरोपी पंकज पाटील याला सापळा रचून मोठ्या शिताफीने सुलतानपूर शिवारातील एका शेतातून जेरबंद केले. या घटनेत गर्भपातासारखे दृष्कर्म करणाऱ्या डॉक्टर व नर्स यांचा तपास अद्याप सुरू आहे.
याबाबत शहादा पोलिसात पोक्सोसह, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व इतर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला कारणीभूत मुख्य सूत्रधार पंकज मंगा पाटील, अंबालाल पाटील, शांत्या पाटील, भुऱ्या शांत्या पाटील रा. ब्राह्मणपुरी अशा चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक डॉक्टर व एक नर्स फरार आहेत. मध्य प्रदेशातील मल्फा येथील घटनास्थळी फॉरेन्सिक पथक रवाना झाले असून पुढील तपास सुरू आहे.
सदरचा गुन्हा हा अल्पवयीन मुलीवर तिला आमिष दाखवून बलात्कार केला आणि गर्भवती राहिली होती. तिचा खासगी डॉक्टरमार्फत गर्भपात करण्यात आला होता. अशा गंभीर घटनेबाबत पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यावर लागलीच कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी सांगितले. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत करीत आहेत.