मोड परिसरातील शेतकरी नवल फकिरा राजपूत यांच्या उसाच्या शेतात २४ फेब्रुवारी रोजी मादी बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ऊसतोड कामगार ऊस तोडणी करत असताना मजुरांना बिबट्या मादीचे दोन बछडे उसात आश्रय घेताना आढळून आले होते. शेतकरी नवल फकिरा राजपूत यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती दिली होेती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच घटना ठिकाणी धाव घेत तळोदा वन विभागाचे वनक्षेत्रपाल नीलेश रोडे यांनी उसाच्या शेताची व आजूबाजूच्या परिसरातील पाहणी करून बिबट्या मादीचा शोध घेण्यात आला. मादी बिबट्या मिळून न आल्याने वन अधिकाऱ्यांनी या परिससरात चार ट्रॅप कॅमेरे बसविले होते; मात्र कॅमेऱ्यात मादी बिबट्या दिसून न आल्याने वन अधिकारी नीलेश रोडे, नंदु पाटील, राजा पावरा, अमित पावरा, एस.ओ.नाईक यांनी बछडे असलेल्या ठिकाणासह परिसरात तपास केला असता मिळाले नाही. त्यामुळे रात्रीत मादी बिबट्याने बछड्यांना उचलून नेल्याचा अंदाज यावेळी अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. बछड्यांच्या अधिक तपासासाठी या परिसरात ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आले आहेत, तसेच परिसरातील नागरिकांना व ग्रामस्थांना शेतात जाताना व परिसरात वावरताना बछडे दिसून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल नीलेश रोडे यांनी केले.
बछडे दोन महिन्याच्या आसपास वयाचे होते, म्हणून बिबट्या मादी येऊन बछड्यांना दुसरीकडे नेले असल्याचा अंदाज आहे. संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्याने राहिलेला ऊस तोडणी मजुरांंकडून करावी, यकरिता आमचे वन अधिकारीही ऊस तोडणीच्या ठिकाणी हजर राहतील.
-नीलेश रोडे, वनक्षेत्रपाल, तळोदा.