शहादा तालुक्यातील जयनगर येथे खानदेशातील उजव्या सोंडेचा गणपती म्हणून हेरंब गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी एक किंवा दोनदा येणाऱ्या मंगळ चतुर्थीला गुजरात, मध्य प्रदेश तसेच संपूर्ण खान्देशसह हजारो भाविक दर्शनासाठी व नवस फेडायला येत असतात. परंतु कोरोनाच्या पुन्हा वाढत्या प्रभावामुळे प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत विश्वस्त मंडळाने दिवसभर मंदिर बंद ठेवले. त्यामुळे भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. प्रशासनाच्या आदेशामुळे अंगारकी चतुर्थीला नेहमी येणाऱ्या भविकांपेक्षा निम्म्याहून कमी भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. मंडळाकडून दर्शन घ्यायच्या अगोदर हाताला सॅनिटायझर मारले जात होते. तसेच येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मास्क घातले आहे का नाही याचीही काळजी मंडळाकडून घेतली जात होती.
प्रशासनाने यात्रा रद्दचे आदेश दिल्याने मंदिर विश्वस्त मंडळाकडून पहाटे चार वाजता एका जोडपेसह आरती करून दिवसभर मंदिर बंद ठेवले. संध्याकाळीही आरतीच्या वेळेस फक्त एका जोडप्याला प्रवेश देऊन आरती करण्यात आली होती. एकूणच दिवसभर विश्वस्त मंडळाने मंदिर बंद ठेवून आदेशाचे पालन करत भाविकांसाठी बाहेरूनच दर्शनाची सोय करून दिली होती. भाविकांनीही नियमांचे पालन करत गर्दी होऊ न देता दर्शन घेतले. हेरंब गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी यांनी भाविकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
मी दर महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला तसेच दरवर्षी येणाऱ्या मंगळ चतुर्थीला नियमितपणे येथे दर्शनासाठी येत असतो. परंतु इतिहासात प्रथमच कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे विश्वस्त मंडळाला मंदिर बंद ठेवावे लागले. तरीही दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मंडळाने सोशल डिस्टन्सिंगच्या पालनासह दर्शनाची चांगली सोय करून दिली होती. -हंसराज पुंडलिक सोनवणे, भाविक, दोंडाईचा.