नंदुरबार : कोरोना काळातील वर्षभरात मास्क न लावणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे यासह इतर नियमांचा भंग केल्याप्रकरणी १ लाख २१ हजार जणांकडून तब्बल अडीच कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. १२ पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
कोरोनासंदर्भात शासनाने वेळोवेळी लावलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी वर्षभर ही कारवाई केली आहे. त्याअंतर्गत सहा हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून सहा हजार ६१७ व्यक्तींकडून ३१ लाख २३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क न लावणाऱ्या २६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना ६० लाख ५६ हजार रुपये दंड आकारण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या एक लाख २१ हजार ९५१ प्रकरणांत एक कोटी ५४ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून ३९ लाख ६१ हजार रुपये वसूल करण्यात येणार आहे.