नंदुरबार : नंदुरबार रेल्वेस्थानकाचा प्लॅटफार्म क्रमांक एक प्रवाशांच्या जीवावर उठणारा ठरत आहे़ प्लॅटफार्म व रेल्वे रुळ यातील अंतर नियमापेक्षा जास्त असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे़ विशेष म्हणजे नुकतेच संबंधित प्लॅटफार्मचे डागडुज्जीचेही काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते़गुरुवारी धावती नवजीवन एक्सप्रेस पकडताना झालेल्या अपघातात पद्मशाली शंकर या तेलंगाना येथील मुळ रहिवासी असलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला होता़ रेल्वेमधील सूत्रांनी सांगितल्यानुसार अपघातात प्रवाशाची चूक तर होतीच परंतु रेल्वे रुळ व प्लॅटफार्म यातील अंतरदेखील जास्त असल्याने अपघातात जिवीतहाणी झाल्याचे सांगण्यात आले होते़नुकतीच झाली होती डागडुज्जीगेल्या काही महिन्यांपूर्वी प्लॅटफार्म क्रमांक एक व काही प्रमाणात दोनचेही काम पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते़ डागडुज्जीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना आवश्यक असतानाही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे़ याउलट प्लॅटफार्म दोनवर मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्यात आलेली आहे़ प्लॅटफार्म क्रमांत दोन वरील सिमेंटचे बांधकाम काही प्रमाणात बाहेर काढण्यात आलेले आहे़ यामुळे रेल्वे रुळ व प्लॅटफार्ममधील अंतर कमी होण्यास मदत झालेली आहे़ दरम्यान, अपवादात्मक परिस्थितीत प्रवाशाचा पाय सटकून तो रेल्वेखाली आल्यास प्लॅटफार्म व रेल्वे यात पुरेशी पोकळी असल्याने प्रवासी वाचण्याची शक्यता अधिक आहे़ तशी व्यवस्था प्लॅटफार्म क्रमांक एकवर नाही़ सलग बांधकाम करण्यात आलेले असल्याने अपघात जिवीतहाणी होण्याचा धोका अधिक निर्माण झालेला आहे़याबाबत विभागीय वरिष्ठ अभियंता पी़एस़ यादव यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, प्लॅटफार्म क्रमाक एकचे बांधकाम आधीपासूनच करण्यात आलेले आहे़ त्यामुळे संबंधित प्लॅटफार्मची केवळ डागडुज्जी करण्यात आलेली आहे़ प्लॅटफार्म क्रमांक एकचे बांधकाम दोन सारखे करणे शक्य नसून यासाठी साधारणत: दोन कोटी रुपयांचा खर्च येईल शिवाय याला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचेही या वेळी अभियंता पी़एस़ यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ रेल्वे रुळ व प्लॅटफार्मातील अंतर हे १.६ मीटर एवढे असणे आवश्यक असते़ परंतु प्रत्यक्षात प्लॅटफार्म क्रमांक एकवर या नियमाला तिलांजली देण्यात आली आहे़ या ठिकाणी रेल्वे प्लॅटफार्म व रेल्वे रुळातील केंद्र भाग यातील अंतर हे प्रत्येक ठिकाणी असमान असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे साहजिकच यातून अपघात होऊन जिवीतहाणी होण्याचा धोका अधिक वाढला असल्याचेच यातून दिसून येत आहे़ दरम्यान, प्लॅटफार्म क्रमांक एक हा अत्यंत अशास्त्रीयदृष्टीने व नियमाला धाब्यावर बसवून बांधण्यात आलेला आहे़ त्यामुळे याचे पुन्हा नव्याने बांधकाम करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे़ गुरुवारी धावती नवजीवन एक्सप्रेस पकडताना झालेल्या अपघातात मृत्यू झालेला अज्ञात व्यक्ती हा पद्मशाली शंकरच असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे़ गुरुवारी रात्री मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आल्यावर मृताची ओळख पटली़ पद्मशाली शंकर हा मुळचा तेलंगाना येथील रहिवासी आहे़ सूरत येथे बहिण राहत असल्याने कामाच्या शोधात पद्मशाली हा सूरत येथे गेला होता़ तेथे छोटे-मोठे काम मिळाल्यामुळे रोजगारासाठी तोही तेथेच स्थायीक झालेला होता़ दरम्यान, तीन ते चार महिन्यातून एक वेळा पद्मशाली हा आपल्या मुळ गावी तेलंगाना येथे जात असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून देण्यात आली़ दरम्यान, गावी गेल्यानंतर पुन्हा सूरत येथे कामावर जाण्यासाठी जात असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले़ नंदुरबार येथे काही वेळ रेल्वे थांबत असते़ तसेच येथील रेल्वे स्थानकावर जेवनाचीही बऱ्यापैकी सोय असल्याने अनेक प्रवासी मिळालेल्या काही मिनीटांमध्ये जेवन घेण्यासाठी रेल्वे बाहेर जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली़
बेढब बांधकामामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 11:24 IST