गेल्या हंगामापासून कोरोनामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे. उत्पादित मालाला भाव नसल्याने खर्चही निघणे दुरापास्त झाले होते. यंदा तरी उत्पादित मालाला अपेक्षित भाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी जोमाने खरिपाच्या तयारीला लागला आहे. लवकरच पाऊस सुरू होईल याचा अंदाज आल्याने शेतकरी कामे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शेतीची मशागत अंतिम टप्प्यात आली आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी आगाऊ बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शहरातील बी- बियाणे विक्रीच्या दुकानांवर गर्दी होत आहे. विकत घेतलेल्या बियाणांच्या खरेदी-विक्रीची बिले शेतकरी आवर्जून दुकानदारांकडून घेत आहेत. दुकानदारही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बियाणांमुळे नेमका काय फायदा होऊ शकतो याची माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करीत आहेत.
बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी
बियाणांच्या पिशवीवर लेबल, सील, बियाणाची जात, प्रकार, लॉट नंबर, बियाणे वापराची अंतिम तारीख याविषयी खात्री करून बियाणांची खरेदी करावी, तसेच संबंधित बिले शेतकऱ्यांनी जपून ठेवावीत. घरचे बियाणे वापरताना त्याची उगवणक्षमता तपासावी. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांचा दर्जा व भेसळ याबाबत काही शंका असल्यास कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बियाणे खरेदीसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येत आहेत. यंदा काहीशी दरवाढ झाली असूनही खरेदीसाठी उत्साह आहे. बियाणे खरेदी करताना विचारण्यात येणाऱ्या शंकांचे निरसन केले जात आहे.
-गणेश पाटील, बियाणे विक्रेता, शहादा
गेल्या हंगामात कोरोनामुळे उत्पादित मालाला अपेक्षित भाव नसल्याने खर्चही कसाबसा निघाला. यंदाचा खरीप हंगाम तरी चांगला येईल, अशी अपेक्षा आहे.
-राकेश पाटील, शेतकरी, शहादा