ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भोरटेक येथील महात्मा गांधी राष्ट्रीय हमी रोजगार योजनेंतर्गत मंजूर विहिरीची रक्कम काढून विहीर बांधण्यात आली नसल्याने संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भोरटेक, ता.शहादा येथील शेतकरी सुनील जगतसिंग पवार यांनी सन २०१५-१६ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत भोरटेक शिवारात स.नं. २३/१/१ मध्ये विहीर मंजुरीकरिता प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव मंजूर होऊन संबंधित शेतकऱ्याने विहिरीचे खोदकाम केलेले नसून या योजनेचे अनुदान प्राप्त करून घेतलेले आहे. त्याबाबत आपल्यामार्फत चौकशी होऊन संबंधित शेतकरी व ग्रामपंचायत कर्मचारी, शासकीय कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांची चौकशी होऊन संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर एकनाथ जगतसिंग राजपूत यांची सही आहे.