लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभाग सरसावला असून शिक्षकांना कोरोना स्वॅब तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्याही सुचना देण्यात आल्याने शिक्षकांची लगबग सुरू झाली आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातचे पत्र शिक्षण विभागाने काढले आहे. त्यानुसार सर्व शाळांनी तयारीला वेग दिला आहे. एका वर्गात किती विद्यार्थी बसवावे किंवा शाळांची वेळ कशा ठेवाव्या याबाबत खलबते सुरू आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या लक्षात घेता अशा शाळांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यासाठीचे नियोजन देखील करण्यात येत आहे. पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील किंवा कसे याबाबतही संभ्रम कायम आहे. कारण आधीच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात शाळा सुरू होत असल्यामुळे पालकांमध्ये साशंकता आहे. दरम्यान, शाळांनी वर्ग आणि बेंच निर्जंतुकीकरण करणे, थर्मामिटर, ॲाक्सीमिटर, सॅनिटायझर उपलब्ध करण्याची लगबग सुरू केली आहे. त्यासाठी शाळांना खर्च करावा लागणार आहे. विद्यार्थी व पालकांना देखील आवश्यक त्या सुचना द्याव्या लागणार आहेत.
तालुकास्तरावर होणार कोरोना स्वॅब संकलन...
- जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता तालुका स्तरावर स्वॅब संकलन करण्यात येणार आहे. सर्वच शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.
- २७ जानेवारीच्या आत सर्व शिक्षकांची कोरोना स्वॅब चाचणी होईल यासाठी प्रयत्न राहणार आहे. त्याकरीता गटशिक्षणाधिकारी स्तरावर सुचना देण्यात आल्या आहेत.
- शाळांना दिले पत्रशिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून शिक्षकांच्या कोरोना टेस्टचे नियोजन करण्याचे सांगितले आहे. याशिवाय शाळांना देखील वर्ग सुरू करण्याच्या तयारीसाठीच्या सुचना दिल्या असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी डॅा.युनूस पठाण यांनी दिली.