लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे सर्व सण, उत्सवांवर नियंत्रण आले आहे. गणेशोत्सवात देखील भाविकांनी प्रशासनाच्या नियम व अटींचे पालन करावे. काही बाबींसाठी प्रशासनाने कायद्याचा आधार घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केली.गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी सांगितले, यंदाचा गणेशोत्सव तसेच मोहर्रम आणि उरूसबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाच्या सुचनांचे पालन केले. मूर्ती प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका काढल्या नाहीत. आता विसर्जनासाठी देखील मिरवणुका काढू नये. सार्वजनिक ठिकाणी दर्शनासाठी, आरतीसाठी पाच पेक्षा अधीक व्यक्ती उपस्थित राहू नका. मूर्ती विसर्जनासाठी लांब ठिकाणी जाऊ नये यासाठी नंदुरबार पालिकेने चार ठिकाणी कृत्रीम तलावांची सोय केली आहे.उत्सव साजरा करतांना कुठेही कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. अशा काळात सार्वजनिक उत्सव साजरा करतांना काळजी घ्यावीच लागणार आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर प्रत्येकाने करावा.मोहर्रमच्या मिरवुणका तसेच यंदाचा उरूस देखील रद्द करण्याचा निर्णय संबधीत कमिटी आणि आखाड्यांनी घेतला आहे. त्यांचा निर्णयाचेही कौतूक करावेसे वाटते.कोरोना रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज आहेच. परंतु नागरिकांनी देखील याबाबत स्वत:हून काळजी घेतली तर प्रशासनावरील ताण देखील कमी होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारूड यांनी सांगितले.
उत्सव काळात प्रत्येकाने नियम व अटींचे पालन करा : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 13:02 IST