तळोदा : शहरातील हातोडा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचा पहिल्याच पावसात खालचा पाया खचला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले होते.
तळोदा पालिकेमार्फत शहरातील हातोडा रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. चार महिन्यांपूर्वीच या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. संबंधित ठेकेदाराने या कालावधीत काम पूर्ण करून आठ दिवसांपूर्वीच लोकार्पण करण्यात आले होते. प्रवेशद्वाराच्या डाव्या पिलरच्या खालची जमीन खचली. त्यामुळे तेथे खड्डा तयार झाला आहे. त्या ठिकाणी सावधानतेचा फलक देखील लावण्यात आला आहे. पहिल्याच पावसात प्रवेशद्वाराची माती खचल्याने कामाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
शहराच्या नावाचाही चुकीचा उल्लेख
प्रवेशद्वारावर टाकण्यात आलेल्या शहराच्या नावाचाही चुकीचा उल्लेख करण्यात आला असून तळोदाऐवजी तलोदा असे लिहिण्यात आले आहे. नावाच्या चुकीच्या अशा उल्लेखामुळे शहरवासीयांनी आधीच नाराजी व्यक्त केली आहे. त्याचीही दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.