लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरपंचपद लिलावामुळे राज्यभरात गाजलेल्या व त्यानंतर निवडणूक आयोगाने रद्द केलेल्या खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक आता नव्याने होणार आहे. १२ मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. खोंडामळी या ग्रामपंचायतीची निवडणूक मतदानाच्या दोन दिवस आधी रद्द करण्यात आली होती. आता नव्याने या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. १५ फेब्रुवारी रोजी अधिसुचना काढण्यात येणार असून १६ ते २३ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. २४ फेब्रूवारीला दाखल अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी अर्ज माघारीची मुदत राहणार आहे. तर १२ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान घेतल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. नव्याने निवडणूक लागल्याने आता या ग्रामपंचायीत निवडणूक होते की बिनविरोध निवडणूक होते याकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
खोंडामळी ग्रा.पं.ची १२ मार्चला निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 12:22 IST