घरोघरी टाळ, मृदुंग, भजनसाठी लागणारे वाद्य सहसा आढळत असतात. तर मोजक्या घरांमध्ये पखवाज किंवा सुमधुर संगीताची पेटीही आढळते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक निर्बंध शिथिल न केल्याने जे नवीन हौशी व्यक्ती आहेत ते या सर्व वस्तू घेण्यापासून सध्यातरी वंचितच दिसत आहेत. कारण सध्या कोरोना महामारीमुळे सगळे छोटे-मोठे उद्योगधंदे बरेच दिवस बंद राहिल्याने सगळ्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. लोकांना सध्या आपल्या उदरनिर्वाहाची चिंता लागली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त शासनाच्या नियमांचे पालन करून सण साजरा करायचा म्हणून लोकं साजरा करत आहेत.
आजघडीला ग्रामीण भागात अनेक लोकांकडे सुमधूर संगीताचे वाद्य जशा स्थितीत असतील तशा स्थितीतच ते पडून आहेत. मात्र, त्यांना डागडुजी करण्याकडेही लोकं कोरोनामुळे आणि आर्थिक घडी बिघडल्यामुळे दुर्लक्ष करीत आहेत. आता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकांची तयारी सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या अगोदर जसा लोकांमध्ये उत्साह दिसून यायचा, तसा उत्साह निर्बंधामुळे मागील वर्षापासून सण-उत्सवासाठी लोकांमध्ये दिसून येत नाही.
तर प्रत्येक गणेश उत्सवाला ग्रामीण भागातील तरुण मंडळींकडून ढोल, ताशे, पखवाज, पियानो यासारखे वाद्य गणेश उत्सव सुरू होण्याच्या अगोदरच व्यवस्थित नीटनेटके करून ठेवलेली जातात. तसेच यासारखे वाद्य विक्रीवालेही प्रत्येक खेडोपाडी वाद्य विकत असतात. मात्र, कोरोनामुळे पूर्वीसारखी ही वाद्ये विकणारे उत्सव काळात आता दिसून येत नाही. तसेच वाजण्यावरही मर्यादा आल्यामुळे मागील वर्षापासून ग्रामीण तसेच शहरी भागात यासारख्या वाद्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोकांचे कान आसुसलेले आहेत.