लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी कारखान्याच्या बाह्य भागात रविवारी दुपारी अचानक आग लागल्याने धावपळ उडाली. आगीचे निश्चित कारणाचा शोध घेतला जात आहे. या आगीत सुमारे २० लाखांचे नुकसान झाले.नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकार साखर कारखाना डोकारे परिसरात यंत्र संच असलेल्या शेडच्या बाहेरील भागात रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याचे काही स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. नवापूर पालिकेचे अग्निशामक दलही घटनास्थळी वेळीच दाखल झाले. अग्निशामक दल व स्थानिक ग्रामस्थांनी मिळून प्रयत्न केल्याने दोन तासात आग आटोक्यात आली. आगीत कारखान्याच्या बाहेरील भागाचे नुकसान झाले आहे. डोकारे ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. नवापूर तालुक्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून तीव्र उन्हामुळे कोरड्या चाऱ्याने पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. १०० टन बगॅस व इतर साहित्य आगीत खाक झाले असून सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कारण समजू शकले नसून कारखान्याचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत.
आगीत बगॅससह इतर साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:50 IST