नंदुरबार : गेल्या सात ते आठ दिवसात पावसाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावली. परंतु गेल्या दोन दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढल्याने पावसाचे ढग निघून जात आहेत. त्यामुळे पुन्हा पावसाची हुलकावणी सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी खरीप क्षेत्रात पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे. साधारणत: २५ ते ३० किलोमीटर प्रतीतास या वेगाने वारे वाहत आहेत. पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाऱ्याची दिशा आहे. त्यामुळे देखील खान्देशात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणने आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरीच्या ५० टक्केवारी ओलांडली नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात दमदार आणि पेरणीलायक पाऊसच झाला नव्हता. त्यामुळे ४० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्याच झालेल्या नव्हत्या तर यापूर्वी पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके वाया जाण्याची भीती होती. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे मात्र पिकं वाचली आहेत.
दरम्यान, येत्या पाच दिवसात जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा हवामान केंद्रातर्फे देण्यात आला आहे.