बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, धुळे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष छोटू पाटील, नंदुरबार जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बापू पाटील, शहादा तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र गोसावी, उपाध्यक्ष दीपक पाटील, दिलीप ठाकरे, सचिव सुरेशगीर गोसावी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब शिंदे म्हणाले की, पोलीस पाटील हा शासन आणि जनतेमधील दुवा असून, त्यासाठी पोलिसांसह प्रशासनाला विविध कामांसह कोरोनाच्या महामारीत खांद्याला खांदा लावून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलीस पाटलांना दरमहा १५ हजार रुपये मानधन मिळावे. कोरोना काळात योद्धा म्हणून कर्तव्य बजावत असताना मयत झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना ५० लाखांपर्यंत विमा कवच मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून, त्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन शासनाकडे एकजुटीने मागणी केली आहे. आगामी काळात राज्यातील पोलीस पाटलांचा मोठा मेळावा घेण्यात येणार असून, त्यात विविध अडीअडचणी जाणून घेण्याकरिता व तळागाळातील पोलीस पाटलांना न्याय देण्याचा प्रयत्न करून संघटनेच्या माध्यमातून बळकटीकरण करण्याविषयी मार्गदर्शन केले जाईल, असे सांगितले.
प्रास्ताविक बापू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन गजेंद्रगीर गोसावी यांनी केले. आभार पुरुषोत्तम पाटील यांनी मानले. बैठकीसाठी पोलीस पाटील सखाराम शिंदे, प्रवीण पाटील, वैशाली पाटील, दिनेश पाटील, सुभाष भिल, सुनील भिल, मोहन रावताळे, गौतम खर्डे व पोलीस पाटलांनी परिश्रम घेतले.