कोठार : काळ्या बुरशीचे म्हणजे म्युकरमायकोसिसचे ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इंजेक्शनचे डोस मिळत नसल्याने रुग्णांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांनी आपली व्यथा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवली आहे.
याबाबत जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दि. २२ मे २०२१पासून काळी बुरशी संसर्ग केंद्र सुरू करण्यात आले आहे. याच दिवसापासून आम्ही केंद्रात उपचारासाठी दाखल झालो आहोत. ऑपरेशन करणार्या डॉक्टरांनी सूचित केल्याप्रमाणे प्रत्येक रुग्णाला दर दिवशी दोन, चार, पाच याप्रमाणे इंजेक्शन द्यावे, असे नोटींग केलेले आहे.
असे असताना जिल्हा रुग्णालयातील म्युकरमायकोसिस केंद्रात त्याप्रमाणे प्रत्येकाला इंजेक्शन न देता एकच इंजेक्शन दिले जात आहे. रोज एक इंजेक्शन देतांनासुध्दा सातत्य ठेवले जात नसल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. इंजेक्शनचा स्टाॅक संपला, या सबबीखाली दर रविवारी इंजेक्शन दिले जात असल्याचे देखील रुग्णांनी निवेदनात म्हटले आहे. दि. ३१ मे व १ जून २०२१ या दोन दिवशी रुग्णांना इंजेक्शनच दिले गेले नसल्याचा प्रकार घडला असून, इंजेक्शन स्टाॅक संपला आहे, असे सांगण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातील म्युकरमायकोसिस केंद्रात दाखल असणाऱ्या ११ रुग्णांच्या निवेदनावर सह्या आहेत.
रुग्ण आले मेटाकुटीला
या सर्व प्रकारांमुळे रुग्ण हे पूर्णपणे वैतागून गेलेले आहेत. पहिलेच प्रत्येकाचे मानसिक संतुलन बरोबर नाही. त्यात याची भर पडली आहे. यामुळे रुग्ण मेटाकुटीला आलेले आहेत, असे निवेदन म्हटले आहे. दोन - दोन दिवस असेच बेडवर पडून राहावे लागते. तरी या कामात योग्य नियोजन करण्यात यावे व रोज कमीत कमी अखंडरित्या दोन इंजेक्शन तरी देण्यात यावीत, ही आमची माफक याचना आहे, अशा शब्दांत निवेदनातून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे.