लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. शुक्रवारी झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी सकाळी १० वाजेपासून तहसील कार्यालयात तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली आहे.राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. के. सी. पाडवी यांचा बालेकिल्ला असलेल्या या तालुक्यात ११ ग्रामपंचायती या काँग्रेसने कायम राखल्या आहेत. उर्वरित पाच ग्रामपंचायतींवर शिवसेनेने यश प्राप्त केले आहे. तालुक्यात होत असलेल्या यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका या गेल्या काही वर्षांतील निवडणुकांपेक्षा वेगळ्या ठरल्या होत्या. प्रस्थापितांना युवा उमेदवारांनी आव्हान दिल्याने निवडणुकांकडे लक्ष लागून होते. दरम्यान, काँग्रेसनेही अनेक युवकांना संधी दिल्याने युवकांविरोधात युवक अशा लढती तालुक्यात झाल्या. यात काँग्रेस पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांनी यश प्राप्त केलेतालुक्यातील काकडदा, खामला, सिसा, काकरपाटी, पाडली, वरखेडी, भोगवाडे खुर्द, धनाजे, उमराणी, मुंदलवाणी, हातधुई या ग्रामपंचायतींवर काँग्रेसने यश प्राप्त केले, तर घाटली, कुंडली, खर्डा, मनवाणी, आचपा या पाच ग्रामपंचायतींवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलने विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्वाधिक लक्ष लागून असलेल्या काकडदा ग्रामपंचायतीवर माजी बांधकाम सभापती व धडगाव तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रमसिंग वळवी यांच्या पॅनेलने यश मिळवले आहे. याठिकाणी रवींद्र बाज्या वळवी, दिना संतोष पाडवी, टीलू आपसिंग पाडवी, रवींद्र आपसिंग पाडवी, विनोद सत्तरसिंग मोरे, प्रीतम प्रदीप पाडवी, अनिता जामसिंग पाडवी यांनी, तर शिवसेना पुरस्कृत पॅनेलकडून पोपटीबाई बारक्या डोमखले, जयश्री मोग्या तडवी, भाईदास सांघा पटले, गुलाबीबाई भोलेनाथ रहासे हे उमेदवार विजयी झाले आहेत.
धडगाव तालुक्यावर पालकमंत्री के.सी.पाडवी यांचे वर्चस्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 13:48 IST