लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा दाैर्यावर आलेल्या आरोग्य सेवा संचालनालयातील संचालकांनी दुसर्या दिवशीही २५ आरोग्य केंद्र, सहा ग्रामीण रुग्णालय आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालयात भेट देत माहिती जाणून घेतली. प्रामुख्याने धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांना महत्त्व देत कसून तपासणी करत माहिती गोळा केली आहे. आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांनी पथकासह धडगाव तालुका, डाॅ. सतीष पवार यांनी धडगाव, डाॅ. नितीन अंबाडेकर यांनी अक्कलकुवा, डाॅ. विजय कंदेवाड, यांनी अक्कलकुवा, डाॅ. आडेकर यांनी तळोदा, डाॅ. प्रकाश पाडवी यांनी नवापूर, डाॅ. पट्टनशेट्टी यांनी नंदुरबर आणि डाॅ. फारूखी यांच्या नेतृत्त्वातील पथकाने शहादा तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. दुर्गम भागात चार ते पाच अधिकार्यांचे तर सपाटीच्या तालुक्यांमध्ये तीन व दोन अधिकार्यांचे पथक तपासणी करत असल्याचे दिसून आले. आरेाग्य केंद्र व उपकेंद्रात भेटी देणार्या अधिकार्यांनी गर्भवती माता व कुपोषित बालकांच्या पालकांसोबत थेट संवाद साधत आरोग्य विभागाच्या योजनांबद्दल प्रश्न विचारले. सुरू असलेल्या या दाैर्यात केवळ पाहणी करुन कागदपत्रांची तपासणी करणार्या अधिकार्यांनी काही वैद्यकीय अधिकार्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत समाविष्ट असलेल्या पाड्यांवर भेटी देण्यात आल्या. यासाठी काहींनी कर्मचार्यांसोबत पाच ते सात किलोमीटर पायपीट करत लाभार्थींच्या भेटी घेतल्या.
अती दुर्गम भागातील पाड्यांना दिली भेट पाहणी दाैर्यासाठी आलेले अधिकारी प्रथमच दुर्गम भागात आले आहेत. त्यांच्याकडून धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील पाड्यांना लक्ष करण्यात आले. उपकेंद्रांमध्ये नोंद असलेल्या वैयक्तिक लाभार्थी व कुपोषित बालकांच्या पालकांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले. यांतर्गत बिलगाव, मणिबेली, राजबर्डी, पिंपळखुटा, जांगठी या अती दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांंतर्गत येणार्या पाड्यांवर अधिकारी पायी पोहोचले होते. पायी पोहोचून लाभार्थींच्या घरांमध्ये जावून त्यांच्या आरोग्याचा आढावा त्यांनी घेतला आहे.
येथे दिल्या भेटी बुधवारी धडगाव तालुक्यातील राजबर्डी, बिलगाव, सोन, खुंटामोडी, काकर्दा, मांडवी. अक्कलकुवा तालुक्यातील पिपंळखुटा, जांगठी, मणीबेली, जमाना व मोलगी ग्रामीण रुग्णालय, मोरंबा, वडफळी.तळोदा तालुक्यातील वाल्हेरी, प्रतापपूर.नवापूर तालुक्यातील उमराण, चिंचपाडा, धनराट, गताडी या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विसरवाडी ग्रामीण व नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पथकाने भेट दिली. नंदुरबार तालुक्यातील धानोरा व रनाळे ग्रामीण रुग्णालय तर ढेकवद प्राथमिक आरोग्य केंद्रात पथक हजर होते. शहादा तालुक्यात म्हसावद ग्रामीण रुग्णालय, आडगाव, सुलवाडे, कहाटूळ, वडाळी, सारंगखेडा व राणी प्राथमिक आरोग्य केंद्रातही पथकांनी पाहणी केली.