कोरडी झाडेच ठरू शकतात जीवघेणी
नंदुरबार : शहरातून तळोद्याकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा कोरडी झाडे आहेत. रस्त्याला लागून असलेले एक झाड पूर्णपणे कोरडे होऊन कोसळण्याच्या स्थितीत आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देत कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून झाडाचा बुंधा जीर्ण झाल्याचे समोर आले आहे.
अक्कलकुवा परिसरात समस्या
अक्कलकुवा : शहरालगतच्या मिठ्याफळी व मक्राणीफळी भागात बिबट्याचा संचार असल्याचे नागरिक सातत्याने सांगत आहेत. वनविभागाला माहिती देऊनही अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. या भागातील नागरिकांच्या पाळीव गुरांवर दरदिवशी हल्ले होत असल्याने वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कच्चे रस्ते नागरिकांना ठरताहेत त्रासदायक
नंदुरबार : शहरालगतच्या वाघोदा, पातोंडा व होळतर्फे हवेली शिवारातील कच्चे रस्ते नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. पाऊस पडून गेल्याने रस्त्यावर चिखल होऊन वाहने फसत आहेत. ग्रामपंचायतींकडे मागणी करूनही उपाययाेजना करण्यात आल्या नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा रहिवासी वसाहतींमधून करण्यात येत आहे.