लोंढरे येथे पाच किलोमीटर अंतरावरील निंभोरे व चार किलोमीटर अंतरावरील काहाटूळ येथे उभारलेल्या टॉवरमुळे रेंज मिळत असते. तीही फक्त घराबाहेरच थोड्याफार प्रमाणात असते. रेंजची तीव्रता कमी असल्यामुळे कॉल लागला तर मधूनच कॉल डिस्कनेक्ट होतो. त्यामुळे ग्राहकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण डिजिटल युगात फोनवरच लोकांची अनेक कामे होतात.
दुसरीकडे कोरोना महामारीमुळे या शैक्षणिक वर्षात अजूनही फार्मसी, इंजिनिअरिंग व इतर शाखांचे ऑनलाईन शिक्षण चालूच आहे. रेंज नसल्यामुळे विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये रेंजअभावी रोष दिसून येत आहे.
केंद्र सरकारने डिजिटल इंडियाच्या धर्तीवर अनेक सेवा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामध्ये वीज बिल भरणे, पैसे ट्रान्सफर करणे यासारखे अनेक गोष्टी घरबसल्या होत असतात. पण रेंज अभावी ग्राहकांना पैसे ट्रान्सफर करायलाही बँकेतच जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. फोरजी पॅकेज होऊनही टॉवरमुळे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोंढरे येथे आयडिया व जिओ कंपनीचे सिमधारक असून गावात यांच्यापैकी एखादे तरी टॉवर उभारायला हवे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आमच्या गावाची लोकसंख्या साधारणत: अडीच हजारांपर्यंत आहे. येथे आयडिया व जिओ सिम कार्डचे दोन्ही मिळून सातशे ते आठशे ग्राहक असतील. आमच्या गावाला कहाटूळ किंवा निंभोरे येथून रेंज भेटत असते. पण त्याची तीव्रता अत्यंत कमी असून रेंजसाठी आमचे मोबाईल ओट्यावरच टांगावे लागतात. घरात बिलकुल रेंज येत नाही. म्हणून आयडिया अथवा जिओ टॉवर कंपन्यांनी आमच्या गावात टॉवर उभे करायला हवे.
शांतीलाल रोकडे, पोलीस पाटील, लोंढरे