नंदूरबार : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने थंडावा शोधण्याचे प्रयत्न नागरिकांकडून होत आहेत. त्यातून एसी सोबत डेझर्ट कुलरला पसंती दिली जात आहे. सध्या जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यांतून कुलरची आवक होत आहे. लाॅकडाऊनमुळे हे कुलर सध्या लपून-छपून विक्री करण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे.
पूल दुरुस्तीची गरज
नंदुरबार : पावसाळ्यात पूल पडणे व रस्ते खचण्याच्या दुर्घटना घडतात. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी पुलांची तपासणी करून त्यांची डागडुजी करण्याचे आदेश आहेत. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाला याचा पूर्णपणे विसर पडला आहे. येत्या पावसाळ्यांपूर्वी जिल्ह्यातील प्रमुख मोठ्या पुलांसह महामार्गांवर छोट्या पुलांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
भाजीपाला लागवड
नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागांत शेतकरी भाजीपाला लागवडीकडे लक्ष देत आहेत. कमी पाण्यात येणारा भाजीपाला लागवडीवर सध्या शेतकरी भर देत असून यासाठी शेतमशागतीची कामेही सुरू झाली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. आरोग्यवर्धक भाज्यांची मोठी खरेदी होत असल्याने भाजीपाला लागवड वाढत आहे.