आमदार राजेश पाडवी यांनी काही दिवसांपूर्वी पायी चालत अतिदुर्गम भागात जाऊन भेट दिली असता उमरापाणी पाड्यातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर भटकंती करावी लागत असल्याचे लक्षात आल्याने आमदारांनी गावकऱ्यांशी चर्चा करीत पिण्याच्या पाण्यासाठी मी माझ्या स्वखर्चाने विहीर बनवून देतो, असे सांगितले होते. गावकऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर आमदार राजेश पाडवी यांनी लागलीच विहिरीच्या कामाला सुरुवात केली. स्वखर्चाने व गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानातून विहिरीचे काम पूर्ण करुन विहिरीचे लोकार्पण केले. यावेळी गावकऱ्यांनी सांगितले की, आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, आपण पहिले आमदार ठरले आहेत की स्वत: दोनवेळा भेट देऊन आमच्या पाड्यावरील पाण्याची समस्या मार्गी लावली.
आमदार पाडवी यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षाचा काळ उलटूनही जिल्ह्यात काही अतिदुर्गम भागातील गावपाडे विकासापासून वंचित आहेत. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. हे माझ्या लक्षात आले व मी लागलीच विहिरीच्या कामाला सुरुवात केली. ती पूर्ण करुन लोकार्पण केली. यासोबतच दोन विहिरींचे कामही प्रगतिपथावर असून तेही लवकरच पूर्ण करून लोकार्पण केले जाईल. तसेच रस्ते, विजेचे खांब असे अनेक प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे सांगितले.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जि.प.चे माजी सदस्य सुनील चव्हाण, माजी सरपंच शंकर नोबल्या वळवी, अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण ठाकरे, अदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दंगल सोनवणे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, वीरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, सुकलाल रावताळे, बाबूलाल पावरा, दिलवर पावरा, गणेश पवार, गोपाल पावरा, गुलाबसिंग भिल, रमेश पावरा, उपसरपंच रामदास पावरा, रमेश मिस्त्री, हेमराज पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.