लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील धुरखेडा येथे वीस कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी हा प्रकार समोर आला. या कावळ्यांचा मृत्यू विषारी अन्न खाल्ल्याने किंवा बर्ड फ्ल्यूने झाला किंवा कसे याबाबत चर्चांना उधाण आले आहे. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृत कावळ्यांचे पार्थिव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. नवापूर येथे बर्ड फल्यू समाेर आल्याने युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास धुरखेडा येथे शेताजवळ व परिसरात कावळे मृत अवस्थेत आढळून आल्यानंतर सरपंच गणेश चौधरी वनविभागाला माहिती दिली. वनपाल दीपक परदेशी, सुभाष मुकडे, डी. डी .पाटील, वन्यजीव संस्थेचे सागर निकुंभे यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी २० कावळे मृत अवस्थेत आढळून आले. पथकाने मृत कावळे गोळा करुन तपासणीसाठी मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठवले आहे. तपासणी अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. एकाचवेळी २० कावळे मृत आढळून आल्याने गावात भितीचे वातावरण आहे. वन विभागामार्फत बुधवारी संपूर्ण परिसरात तपासणी होणार असून आणखी काही कावळ्यांचे मृतदेह परिसरात आढळून येतात का याबाबत विशेष पाहणी केली जाणार आहे. तालुक्यात बर्ड फ्ल्यू ची लागण नाही. मात्र घटनेमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. येत्या आठवड्यात प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल सचिन खुणे यांनी दिली आहे.
धुरखेड्यात मृत कावळे आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:49 IST