गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात घरफोड्यांचे सत्र वाढले असून अज्ञात चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. तालुक्यातील विद्द्याविहार, मोहिदे त.श. येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रा. सुनील पाटील हे नोकरीनिमित्त महाविद्यालयात सकाळी ११ वाजता गेले. त्यांच्या पत्नी व मुलगी या दोघी बाहेरगावी गेल्या असल्याने प्राध्यापक पाटील यांनी घराला कुलूप लावले होते. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी चार वाजेदरम्यान घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील तिन्ही कपाटे उघडून त्यातील सहा तोळे सोन्याचे दागिने व सुमारे पंचवीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.
प्रा. पाटील महाविद्यालयातून घरी आले असता त्यांना आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी त्यांचे शेजारी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांना घटनेची माहिती देऊन घटनास्थळी बोलावले. परिस्थिती पाहिल्यानंतर पाटील यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांचे पथक पोहोचले. चोरट्यांनी तिन्ही कपाटामधील सर्व सामान बाहेर काढून टाकले होते. त्यातील दागिने व रोख रक्कम लंपास केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहादा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरू असून या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. भरदिवसा घरफोडी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.