तळोदा बायपास रोडवर खड्डेच खड्डे
नंदुरबार : तळोदा शहराबाहेरुन अक्कलकुव्याकडे जाणाऱ्या बायपास रोडवर खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. धवळीविहीर फाटा ते काॅलेज चाैफुली दरम्यान हे खड्डे पडले असल्याचे दिसून आले आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक झाले हैराण
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दरदिवशी दुपारी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे वाढता उकाडा आणि दुसरीकडे खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे घामाच्या धारांनी ग्रामस्थ हैराण झाले आहेत. प्रतापपूर परिसरातील इतर गावांमध्येही हीच स्थिती असल्याचे बोलले जात आहे.
तळोदा तालुक्यात आंबा बागांचे नुकसान
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील विविध भागात असलेल्या आंबा बागांमध्ये यंदा वादळी वाऱ्यांमुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. वेगवान वाऱ्यांमुळे आंबे झाडाखाली पडल्याने खराब झाले होते. यातून शेतकऱ्यांनी झाडावरचा माल तोडून घेतल्याचे सांगण्यात आले.
चिनोदा चाैफुलीवर गतिरोधकांची गरज
नंदुरबार : तळोदा शहरातील चिनोदा चाैफुलीवर गतिरोधक टाकण्याची मागणी आहे. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरून तसेच प्रतापपूर व धडगावकडे जाणारी वाहने येथून मार्गस्थ होतात. तसेच या भागात व्यवसायही वाढले आहेत. यामुळे गतिरोधकांची मागणी आहे.
आमलाड पुलासाठीचा खर्च झाला व्यर्थ
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील आमलाड येथे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर देवमोगरा माता मंदिराजवळील पुलावरच्या सळ्या बाहेर आल्या आहेत. गेल्या काही वर्षात बांधकाम विभागाने वेळोवेळी कोट्यवधी रुपये खर्च करूनही पुलावरच्या सळ्या बाहेर निघून बांधकामाच्या दर्जाची साक्ष देत आहेत. या मार्गावरून दरदिवशी शेकडोंच्या संख्येने वाहने ये-जा करत असल्याने दुरुस्तीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
रस्त्यांवर खड्डे
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील काही गावांमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्यात आले आहेत. तयार केलेल्या रस्त्यांचे परीक्षण करण्यासाठी विशिष्ट ठिकाणी तपासणीसाठीचे खड्डे खोदले आहेत. तपासणीनंतरही हे खड्डे जैसे थे असल्याने वाहनधारकांचे हाल सुरू आहेत.
उपाययोजना शून्य
अक्कलकुवा : शहरातील विविध भागात सांडपाण्याच्या गटारी तुडुंब भरल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी गटारी दुरुस्तीची मागणी होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाकडून गटारी दुरुस्तीची कामे सातत्याने रखडत आहेत. याकडे संबंधित विभागांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जयचंद नगरातील रस्ता दुरवस्थेत
नंदुरबार : शहरातील काशिबा गुरव चाैक ते संत सेना चाैक (गुरुकुल चाैफुली) दरम्यान जयचंद नगराकडे जाणारा रस्ता काही दिवसांपूर्वी अचानक पूर्णपणे खोदून टाकण्यात आला होता. यातून संतसेना चाैकाकडे जाणारी वाहने खड्ड्यांमध्ये आदळून अपघात होत आहेत. दरम्यान खोदकामानंतर रस्ता अत्यंत अयोग्यपणे बुजवला गेला असल्याने याठिकाणी चारी पडल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी दुरुस्तीची मागणी आहे.
जीर्ण वडाच्या झाडांबाबत अनास्था
नंदुरबार : तळोदा ते चिनोदा रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा वडाची १०० वर्षांपेक्षा जुनी झाडे आहेत. यातील काही झाडे रस्त्याच्या एका बाजूला कलली आहेत. या झाडांबाबत प्रशासनाकडून अनास्था दाखवली जात असून योग्य कारवाईची अपेक्षा आहे.
तळोदा तालुक्यात टरबुजाचे नुकसान
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर परिसरात काही ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या टरबुजाचे पीक खराब झाल्याचे दिसून आले आहे. ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे फळावर रोग येऊन त्याचा आकार न वाढल्याने हे पीक निकामी झाले आहे.