नंदुरबार : शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास पुन्हा वाढला आहे. रस्त्यांवर, चौकांमध्ये व वसाहतींमधील कुत्र्यांच्या झुंडींनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे. अनेकांना चावा घेतल्यामुळे जायबंदी व्हावे लागत आहे तर रस्त्यावर अचानक वाहनासमोर कुत्रे आल्याने अपघातही झाले आहेत. मोकाट कुत्र्यांना आवरण्यासाठी पालिका प्रयत्न करीत असली तरी फारसा फरक पडलेला नसल्याची स्थिती आहे.
नंदुरबारात सध्या मोकाट गुरे व मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्यावर्षी कुत्र्याच्या चाव्यामुळे एका बालिकेचा बळी गेला होता. त्यावेळी या प्रश्नावर आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने कुत्रे पकडण्याची मोहीम राबविली, परंतु संख्या काही कमी झाली नाही. कुत्र्यांची नसबंदी व ॲन्टी रेबीज लसीकरणासाठी पालिकेला खर्च परवडणारा नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय संस्थाही या कामासाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याची स्थिती आहे.
n भटक्या कुत्र्यांवरील नसबंदीचा खर्च मोठा असतो. एका कुत्र्यासाठी किमान १२०० ते १४००रुपये खर्च येतो. त्यासाठी संबंधित संस्थेला हे काम द्यावे लागते. एवढा मोठा खर्च करणे पालिकेला परवडणारे नाही असे बोलले जाते.
n याशिवाय या कामासाठी संस्था देखील पुढे येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नसबंदीचे काम पुढे रेटले नसल्याची स्थिती आहे.
n पालिकेने स्वच्छता ठेकेदाराकडूनच हे काम करवून घेतले. परंतु त्यांच्याकडे आवश्यक मनुष्यबळ व सुविधा नसल्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
चौक व रस्त्यांवर झुंडी...
n शहरातील असा एकही चौक किंवा रस्ता नाही तेथे कुत्र्यांच्या झुंडी दिसणार नाहीत. किमान ८ ते १२ च्या संख्येने कुत्रे एकत्रित फिरतात.
n त्यामुळे रात्रीच्या वेळी पायी चालणे किंवा दुचाकी चालविणे म्हणजे कसरतच असते. कधी कुत्रे अंगावर धावून येतील याचा नेम नसतो असे चित्र आहे.
या भागात जरा सांभाळूनच...
n नंदुरबारातील जळका बाजार, सोनारखुंट, मोठा मारुती मंदिर चौक, हाट दरवाजा, सिंधी कॉलनी, गिरिविहार गेट, कोरीटनाका, वाघेश्वरी चौफुली, मच्छिबाजार या भागात रात्री जातांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते.
n नवीन वसाहतींमध्ये देखील कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास आहे. वाहनांच्या पाठीमागे लागण्यामुळे अनेकांचे अपघात झाले आहेत.