अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यानच्या पुलावर पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र पादचारी पुलाची गरज असून, या पादचारी पुलाची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर व सध्याच्या शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यान असलेल्या वरखेडी नदीवरील पुलावरून अवजड वाहनासह मोटारसायकलीच्या वर्दळीतून पादचाऱ्यांना मार्ग काढण्यास गैरसोयीचे ठरत असल्याने या पुलाच्या दोन्ही बाजुला स्वतंत्र पादचारी पूल निर्माण करणे गरजेचे झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक तसेच सोरापाडा येथे शाळा, महाविद्यालये, मुला-मुलीची वसतिगृहे, मंदिर, धार्मिक कार्यक्रम, लग्न कार्य बघता व राजकीय पक्षांचे मोर्चे या पुलावरून जात असल्याने सोरापाडा ते अक्कलकुवा शहराला जोडणाऱ्या पुलावर स्वतंत्र पादचारी पूल निर्माण करणे गरजेचे व आवश्यक झाले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.