येथील पालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शेख इकबाल शेख सलीम व अपक्ष नगरसेवक रियाज अहमद अब्दुल लतीफ कुरेशी हे दोघे २३ ऑगस्टपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.
उपोषणकर्त्या दोघा नगरसेवकांशी मंगळवारी दुपारी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. मागितलेली माहिती यापूर्वी वेळोवेळी पुरविली आहे. त्याचप्रमाणे, निवेदनातील प्रत्येक मुद्द्याचा खुलासा करणारे पत्र दोघा नगरसेवकांना दिले व उपोषण सोडण्याची विनंती केली. दोघांनी त्याचे वाचन केले. मात्र, हे पत्र स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी, मुख्याधिकारी यांनी दिलेल्या पत्रावर नगरसेवकांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी उपोषण सोडण्यास असमर्थता व्यक्त केल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू होते.
दरम्यान, नगरसेवकांच्या उपोषणासंदर्भात नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते बाहेरगावी असल्याने संपर्क झाला नाही.