मनोज शेलार
कोरोना लसीकरणाला अखेर सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य विभागातील अर्थात कोरोनासाठी फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे. दोन दिवसांच्या लसीकरणात ८०० पैकी केवळ ५५० कर्मचाऱ्यांनी ही लस टोचून घेतली. त्याची टक्केवारी ६८ टक्केपर्यंतच गेली आहे. लसीकरणासंदर्भात आरोग्य कर्मचारीच उदासीन असताना सर्वसामान्य नागरिक लसीकरणासाठी पुढे येतील का? हा प्रश्न आता उभा राहण्याची शक्यता आहे. लसीकरणाची केवळ भीती हेच कारण पुढे येत आहे. कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी व जास्तीत जास्त लसीकरणासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक ठरणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच आटोक्यात आहे. सुरुवातीचे दोन महिने तर उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी रुग्णसंख्या असलेला नंदुरबार जिल्हा होता. कोरोनासंदर्भात उपाययोजनेसाठी नंदुरबार रोल मॅाडेल ठरू लागला होता. नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा बेफिकीरपणा नडला आणि कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. आजच्या स्थितीत जिल्ह्यात साडेआठ हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या गेली असून मृतांची संख्या २०० च्या घरात पोहचली आहे. दिवाळीनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. शेवटी जिल्हा प्रशासनाला कोरोना रुग्णांसाठीच्या होम आयशोलेशनची सुविधा बंद करणे आणि विवाह समारंभ आणि अंत्ययात्रा यांच्यावर बंधने घालावी लागली आहेत. अशा काळातच कोरोना लस उपलब्ध झाली आणि जनतेला हायसे वाटले. लसीकरणासाठी जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्करची नोंदणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात १० हजार ८५७ जणांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली. त्यासाठी एकूण १२ हजार ४१० डोस प्राप्त झाले आहेत. चार केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. आठवड्यातून चार दिवस प्रत्येकी एका केंद्रावर १०० असे चार केंद्रांवर ४०० जणांना लस दिली जाणार आहे. शनिवार व मंगळवार असे दोन दिवस लस देण्यात आली. या दोन्ही दिवशी सरासरी ६६ ते ६८ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली. बाकी कर्मचारी फिरकलेदेखील नाहीत.
लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कर्मचारी लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे. आधीच नोंदणी करताना प्रशासनाने दुर्धर आजार, गर्भवती, स्तनदामाता, ज्याची इम्युनिटी पॅावर कमी आहे, अशा लोकांना वगळले आहे. असे असताना इतर कर्मचारी लस घेण्यासाठी पुढे का येत नाहीत, हा प्रश्न आहे. वास्तविक कर्मचाऱ्यांमधील भीती घालविण्यासाठी जिल्हास्तरावर स्वत: जिल्हा शल्यचिकित्सकांनी पहिली लस घेतली. इतर केंद्रांवरदेखील त्या त्या प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी आधी लस घेतली. वास्तविक दोन्ही दिवशी अर्थात आतापर्यंत लस घेतलेल्या ५५० कर्मचाऱ्यांपैकी कुणालाही कसलाही त्रास झालेला नाही. असे असतानाही कर्मचारी लस घेण्यासाठी टाळाटाळ का करीत आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे. लसीकरणानंतर त्रास होण्याच्या राज्यात व देशात अगदीच तुरळक घटना घडलेल्या आहेत. ज्यांना त्रास झाला तेदेखील लागलीच बरे झालेले आहेत. जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी भीतीपोटी लस घेत नसल्याचे खासगीत सांगितले आहे. लसीकरण पूर्णपणे यशस्वी होईल. त्यानंतरच आपण लस घेणार असल्याचे एका कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. भीतीच्या अशा माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे लसीकरण ७० टक्क्यांपेक्षा पुढे जाऊ शकले नसल्याची स्थिती आहे.
वास्तविक आरोग्य कर्मचारी स्वत:हून लस घेण्यासाठी पुढे आले तर दुसरे नागरिक लस घेण्यासाठी पुढे येतील. यासाठी प्रशासनाने आवाहन करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला आवश्यकतेपेक्षा अधिक लसींचे डोज मिळालेले आहेत.
एकूणच कोरोनाच्या महाभंयकर पर्वातून सर्वचजण गेले आहेत. आता लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराला दूर पळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमातून लस तयार केली आहे. त्यांचे दावे आणि लोकांना केलेल्या आवाहनालाही तरी प्रतिसाद देऊन लसीकरण १०० टक्के करून घेणे आवश्यक आहे. किमान पहिला टप्पा यशस्वी झाला तर पुढच्या टप्प्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू शकतो याचेही भान प्रशासन आणि लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनी ठेवणे आवश्यक आहे.