नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही अनेकांना कोरोनाकाळात केलेल्या उपचारांचा त्रास जाणवत आहे. यात आता केसगळतीची समस्या समोर आली असून, अनेकांच्या डोक्यावरील केस कमी झाल्याचा दावा केला जात आहे.
कोरोनाकाळात घेतलेल्या औषधोपचारासोबतच चिंता, अपुरी झोप आणि कमी झालेली रोगप्रतिकार शक्ती यातून केसगळती होण्याचे प्रकार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. केसांची अकाली होणारी गळती थांबविण्यासाठी अनेकांनी रुग्णालयांत धावही घेतली आहे. इलाज सुरू करून केसगळती थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हे करा
शरीरातील व्हिटॅमिनची कमी असल्याने केसगळती होत असल्याने त्यादृष्टीने उपचार घेणे योग्य राहणार आहे.
कोरोना झाल्यावर तसेच उपचार घेऊन बरे होणारे अनेक जण सतत टेन्शन आणि चिंतेत बुडाले होते. यातून मानसिक स्थितीवर परिणाम होऊन डोक्यावरील केसांची गळती होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
कोरोनाबाधितावर उपचार करताना मोठ्या प्रमाणावर स्टेराॅइड किंवा इतर रोगप्रतिकार शक्तीवाढीसाठी लागणारी औषधी रुग्णांना दिली गेली होती. या औषधींचा प्रभाव ओसरून गेल्यानंतर त्याचे काहीअंशी दुष्परिणामही समोर येत असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करा घरगुती उपाय
केसगळती समस्या वाढू लागल्यानंतर अनेक जण बाजारातून स्वमाहितीच्या आधारे औषधी आणत आहेत; परंतु यानंतरही त्यांना दिलासा मात्र मिळालेला नाही.
शरीरातील व्हिटॅमिन व अन्नघटकवाढीसोबत वैद्यकीयतज्ज्ञांचा सल्ला यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच उपचार घेणे आवश्यक ठरणार आहे.
नागरिकांना अद्यापही पोस्ट कोविडच्या तक्रारी जाणवत आहेत. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. पोस्ट कोविडच्या तक्रारींचा डाॅक्टरांकडून इलाज करून घेतला पाहिजे. केसगळती ही पोस्ट कोविडच असू शकते.
-डाॅ. रोशन भंडारी, नंदुरबार