लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा संसर्ग झाल्याने शहरातील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे़ यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ११ झाली असून दिवसभरात १३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ जिल्ह्यातील बाधितांची संख्या २६० झाली आहे़रविवारी सकाळी मोठा मारुती परिसरातील ३६ वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती़ यानंतर सायंकाळी ७७ अहवाल येणे प्रस्तावित होते़ हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची तर १० जुलै रोजी मयत झालेल्या आंबेडकर चौकातील वृद्धाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे़ सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील देसाईपुरा येथील ४, एकता नगर १, रायसिंगपुरा १, चौधरी गल्ली येथील एक तर शहादा शहरातील रोड भागातील दोघे व शंकर विहार येथील १ अशा १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २२ वर्षीय युवक ते ८५ वर्र्षे वयाच्या वृद्धेचा समावेश आहे़ या सर्वांना कोविड कक्षात हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातून सकाळी शहरातील देसाईपुरा, भोणे ता़ नंदुरबार आणि नवापूर येथील मंगलदास पार्कमधील प्रत्येकी एकास घरी सोडण्यात आले़ त्यांच्यावर योग्य उपचार केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आल्यावर ही कारवाई करण्यात आली़ आजअखेरीस यातील १५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे़ जिल्हा रुग्णालय तसेच एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल याठिकाणी तयार करण्यात आलेल्या कोविड कक्षात सध्या ९२ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे़ येथील कोविड कक्षात उपचार घेणाऱ्या बाधितांपैकी शुक्रवारी एकास नाशिक तर शनिवारी दोघांना सुरत येथे पुढील उपचारांसाठी रवाना केले आहे़
आंबेडकर चौकातील मयत वृद्धाच्या संपर्कातील तिघांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ नव्याने आढळलेल्या १३ रुग्णांच्या संपर्कातील तब्बल १८ जणांना क्वारंटाईन केले असून यापूर्वी ३७ जण क्वारंटाईन केंद्रात दाखल केले गेले आहेत़