लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात असलेल्या टेलिमेडिसीन सुविधेमुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. गुंतागुंतीचे अनेक आजार आणि शस्त्रक्रियांवर याद्वारे मार्गदर्शन घेण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून येथे नियमित ही सेवा सुरू आहे. त्याचा उपयोगही चांगल्या प्रकारे घेतला जात आहे.येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या चार वर्षांपासून टेलिमेडिसीनची सुविधा उपलब्ध झाली आहे. सुरुवातीला या सेवेत काहीसा व्यत्यय येत होता. परंतु आता अत्याधुनिक संपर्क यंत्रणाकक्ष उभारण्यात आला आहे. या द्वारे येथील वैद्यकीय अधिकारी हे मुंबई येथील केईएम रुग्णालयातील त्या त्या विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतात. अॅलोपॅथीसह आयुर्वेदीक पॅथीचे मार्गदर्शन या ठिकाणी केले जाते.पूर्वी काही आजारांबाबत मार्गदर्शन किंवा इलाज करण्याची सोय नसल्याने रुग्णांना थेट मुंबई येथे उपचारासाठी पाठविले जात होते. त्यामुळे अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना काही वेळा प्राणही गमवावे लागत होते. शिवाय रुग्णाचा वेळ आणि पैसाही वाया जात होता. शिवाय जिल्ह्यात आरोग्याच्या सेवेच्या मर्यादा, निष्णात डॉक्टरांची कमतरता यामुळे या सुविधेचा येथे मोठा फायदा झाला आहे. गेल्या तीन वर्षात याद्वारे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत.जिल्हा रुग्णालयातील टेलिमेडिसीन सुविधेचा नियमित वापर केला जात असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी.सातपुते यांनी दिली.
गुंतागुंतीचे आजार व शस्त्रक्रियांना मिळाला टेलिमेडिसीनचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 12:47 IST