लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गौ तस्करी गौ हत्या रोखण्यासाठी नंदुरबारात पोलिसांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक संशयीतांवर थेट कारवाई करणार आहे. दरम्यान, शहर पोलीस ठाणे आवारात बैठक घेण्यात आली.नंदुरबार शहर पोलीस ठाण्याअंतर्गत हे पथक कार्यरत राहणार आहे. याबाबत पोलीस निरिक्षकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यात गौ हत्याबंद कायदा असतांना सुद्धा नंदुरबारात दररोज शेकडोच्या प्रमाणात गौ हत्या व गौ तस्करी घडत आहेत. याबाबतच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने हे प्रकार रोखण्यासाठी पथक स्थापन करण्यात येत आहे. बकरी ईदच्या अनुषंगाने परिसरात गस्त घालून गौ तस्करी व हत्या करण्यास जनावरे आणणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यात म्हटले आहे.या पथकात फौजदारासह पाच हवालदार व आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.दरम्यान, गौ रक्षक समितीची बैठक सोमवारी दुपारी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात घेण्यात आली. यावेळी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, निरिक्षक सुनील नंदवाळकर आदी उपस्थित होते. येत्या काळात सण, उत्सव लक्षात घेता सर्व गौ रक्षकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पोलीस अधिकाºयांनी केले.
नंदुरबारात गौ तस्करी व हत्या रोखण्यासाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:37 IST